Prashant Jagtap-Manohar Bhide Sarkarnama
पुणे

Video Manohar BhideGuruji : मनोहर भिडे धार्मिक, आतंकवादी, शरद पवारांच्या शिलेदाराची कडक शब्दात टीका !

Sudesh Mitkar

Pune News : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर भिडे यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले. प्रत्येकवेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेगुरुजींना राज्य सरकार बळ देत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु असलेले मनोहर भिडे हे गेले दहा वर्षे स्त्रीयांचा, मुलींचा द्वेष करत आहेत, तसेच धार्मिक द्वेष देखील पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचा शिव-शाहू -फुले -आंबेडकरांच्या परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. राजमाता माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास रचला.

त्या कर्तृत्ववान महिलांचा वारसा जपणाऱ्या महिलांचा मनोहर भिडे नामक मनुवादी विकृताने अपमान केला. मनोहर भिडे व त्यांना बळ देणारे मनुवादी सरकार यांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. मनोहर भिडे हे सातत्याने मुलींनी जीन्स, टी-शर्ट घालू नयेत अशी वक्तव्य करत आहेत. तसेच त्यांनी आता वटसावित्रीला जाताना फक्त साड्या घातलेल्या महिलांनी जावे, असं विधान देखील केलं आहे.

हे विधान अतिशय निषेधार्य आहे. जी वारी देशात आणि विदेशात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते. त्या वारीमध्ये येऊन अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं. यामधून त्यांनी महिलांचा आणि मुलींचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. भिडे गुरुजी हे मनुस्मृतीचे धडे पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करत आहेत. भिडे यांना तातडीने अटक करावी अशी आमची मागणी आहे.

मनोहर भिडे हे त्यांच्या वक्तव्यातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचं स्थान हे सांगलीत आणि महाराष्ट्रात नसून ते जेलमध्ये आहे. भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते मागील काही वर्षांपासून वारीमध्ये येऊन धुडगूस घालत आहेत. वारकऱ्यांना धक्काबुक्की करत आहेत. मनोहर भिडे हे देशातले आणि राज्यातले धार्मिक आतंकवादी असल्याचा आरोप जगताप यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकार मध्ये नैतिकता असेल तर त्यांनी मनोहर भिडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा पुढील आठवड्यात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये भिडे यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT