Swarajyarakshak Sambhaji last episode : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यागाधा सांगणारा 'छावा' चित्रपटाचं कौतुक होत असतानाच, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शेवटावरून प्रश्न उपस्थित केले गेले.
खासदार कोल्हे यांनी एका व्हिडिओद्वारे याला सडेतोड उत्तर दिले. पण खासदार कोल्हेंच्या या व्हिडिओला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. 'या ट्रोलर्सला सुनवताना राजकीय हेतू समजतोय. पण देशात अन् राज्यात 2014 पासून भाजपचं सरकार होते. मग 'छावा' चित्रपट आताच का आणण्यात आला?', असा प्रश्न करत खासदार कोल्हेंनी टोलर्स अन् भाजपला अंगावर घेतलं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीरतेची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट चांगलाच गाजतोय. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील त्याचं कौतुक केलं. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या विकी कौशलच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. पण, याच चित्रपटातील दाखवलेल्या काही प्रसंगावरून वादंग देखील झाला आहे.
'छावा' चित्रपटातील काही प्रसंगावरून इतिहासकारांमध्ये वाद निर्माण झालेला असताना, 2017 मध्ये खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अभिनय केलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवटावर काही प्रश्न उपस्थित केल्याने वाद निर्माण झाले आहेत. खासदार कोल्हेंनी याला एका व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर दिले. परंतु या व्हिडिओला देखील ट्रोल करण्यात आले. खासदार कोल्हेंनी या ट्रोलिंगमागे राजकीय हेतू असल्याचे सांगून भाजपवर निशाणा साधला.
खासदार कोल्हे म्हणाले, "ट्रोलिंगच्या प्रकार हा दुर्दैवी आणि हास्यस्पद आहे. काही ठराविक विचारसरणीच्या टोलर्सकडून हा प्रकार केला जात आहे. पाच वर्षांनंतर या मालिकेवर प्रश्नचिन्हं का उपस्थित केली जात आहेत. मालिका आणि चित्रपट पूर्ण भिन्न माध्यमं आहेत. मालिकेत डिटेल दाखवता येते. तेवढे चित्रपटात दाखवता येत नाही. मालिकेत भव्यता दाखवता येत नाही. तेवढं चित्रपटात दाखवता येते. चित्रपटात हिसांचार दाखवता येतो. तेवढा दूरचित्रवाणीवर दाखवता येत नाही".
'असे असताना सुद्धा ठराविक पद्धतीने टोर्ल करणे, यामागची राजकीय पद्धत आणि हेतू असू शकतो. त्यामुळे तो व्हिडिओ केला. मालिकेचा शेवटच्या दबावावर बोलताना, पवारसाहेबांनी सांगितला म्हणून मालिका गुंडाळली, व्होट बँकेचे राजकारण केले, हे सर्व खोटं आहे. याचाच बुरखा व्हिडिओच्या माध्यमातून फाडला आहे', असा दावा खासदार कोल्हेंनी केला.
ट्रोल करणाऱ्यांनी आव्हान देताना कोल्हे म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणण्यासाठी कोणी काय योगदान दिलं?', असा प्रश्न केला. 'छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मान्य नाही ना! मग तुम्ही का मालिका काढली नाही? नितीन चंद्रकांत देसाई यांनी 2008मध्ये राजे शिवछत्रपती मालिका काढली होती. त्यानंतर नऊ वर्षांचा कालखंड गेला. इतिहास सांगण्यासाठी एवढा काळ का गेला? त्यावेळी सर्व जण कुठे होतात? आता तुम्ही का सळसळताय? बाॅलिवूड खूप मोठं अस्तित्व आहे. खूप मोठा कालखंड आहे. मग आताच 'छावा' सिनेमा का आला?', असे प्रश्न खासदार कोल्हेंनी उपस्थित केले.
'केंद्रात 2014 मध्ये भाजपचे सरकार आले होते. महाराष्ट्रात देखील त्यांचेच सरकार होते. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना न्याय मिळवून देण्यासाठी काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी मिळतात. ज्या मालिकेने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवण्याचे छोटेसे काम केले. आता मात्र ट्रोल करणाऱ्यांचा राजकीय हेतू स्पष्टपणे समोर येतो', असेही खासदार कोल्हे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.