raj thackeray sharad pawar
raj thackeray sharad pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar : "लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं", राज ठाकरेंचं विधान अन् शरद पवारांनी मोजक्याच शब्दांत दिलं उत्तर...

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागा मिळाल्या. तर, 'एनडीए'ला '300 पार'ही करता आलं नाही. भाजपसह 'एनडीए'तील मित्रपक्षांना 292 जागांवर समाधान मानावं लागलं. तर, 'इंडिया' आघाडीनं भरारी घेत 237 जागा मिळवल्या आहेत.

या निवडणूक निकालांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. "लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणून ठेवलं," असं विधान राज ठाकरेंनी केलं. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी काय म्हटलं?

अमेरिकेत 'बीएमएम'च्या एकविसाव्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. "उद्या कोण या पक्षातून त्या पक्षात जातील, हे माहिती नाही. येत्या काळात कोण कोणत्या पक्षात जाते, हे पाहण्यासाठी वर्षभर कळ सहन करू. पण, लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणून ठेवलं," असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं.

राज ठाकरेंच्या विधानावर शरद पवार ( Sharad Pawar ) यांना पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, "कुणाला जागा दाखवली माहिती नाही. पण, आमचे पाय जमिनीवरच आहेत."

शरद पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारला टोले लगावले आहेत. "तुमच्या खिशात काय हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात, तर काय अवस्था होते, हे मी सांगण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या निकालाचा धसका सरकारनं घेतला आहे. त्यामुळे अशाप्रकारची आखणी केली जात आहे. सरकारनं तातडीनं योजना लागू करणार असल्याचं सांगितलं आहे. पण, आता फार दिवस राहिले नाहीत. थोड्याच दिवसात वस्तुस्थिती समोर येईल. आम्ही त्याची वाट बघतोय," असं शरद पवारांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT