Pune, 30 June : लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा ‘गेम प्लॅन’ सांगितला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (ता. 30 जून) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीबाबत (Assembly Election) बोलताना शरद पवार म्हणाले, ज्याप्रमाणे अर्जुनाचे लक्ष हे माशाचा डोळा होता, तसंच आमचं पुढचं लक्ष हे विधानसभा निवडणुका जिंकणं, हे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsena), ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (Congress) आम्ही तिघेही एकत्रित निवडणूक लढणार आहोत.
लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांनी चांगला कौल दिला आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये या तीन प्रमुख पक्ष बरोबरच डावे-उजवे, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष हे देखील आमच्यासोबत होते. मात्र, त्यांना आम्ही लोकसभा निवडणुकीत जागा देऊ शकलो नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत या सहकाऱ्यांच्या हितांची जपणूक करणंदेखील आमची जबाबदारी असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
जागा वाटपाच्या वाटाघाटी अद्याप तरी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये सुरू झालेल्या नाहीत. मात्र, त्याबाबत आम्ही लवकरच चर्चा सुरू करून जागावाटप करू. ज्यांच्या वाट्याला जी जागा आली आहे, त्या जागेवर योग्य उमेदवार निवडून कामाला सुरुवात करू, असं शरद पवार म्हणाले.
निवडणुकीसाठी तीन महिने आमच्या हातात असून या कालावधीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आमचा आहे. जनतेच्या मनामध्ये परिवर्तन करण्याची इच्छा आहे आणि ही परिवर्तनाची त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागत आहोत, असं शरद पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी स्वतंत्र असा चेहरा नसून आमचा सामूहिक चेहरा हाच आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.