sharad pawar sarkarnama
पुणे

खुद्द शरद पवारच म्हणाले,‘इथेही पवारांचेच राज्य दिसतेय!’

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शिरूरमध्ये तब्बल दीड तास थांबून पाहिला कुस्त्यांचा खेळ

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : राजकारणातील डावपेचांतून भल्याभल्यांना आस्मान दाखविणारे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे उत्कट कुस्तीप्रेम शिरूरकरांनी अनुभवले. शिरूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांच्या आखाड्यात त्यांनी थोडथोडकी नव्हे; तर तब्बल दीड तास बैठक मारून पहिलवानांचे डाव आणि प्रतिडावावर टाळ्या वाजवत उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले. (Sharad Pawar stayed in Shirur for hour and half & watched game of wrestling)

दरम्यान या वेळी बोलताना पवार यांनी या आखाड्याच्या आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक करताना या मैदानात मोठी गमंत असल्याचे नमूद केले. ‘पवारांचे राज्य’ यावर चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मल्लिनाथी केली. या कुस्ती आखाड्याचे संयोजक महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा हे पवार, निमंत्रक पहिलवान अशोक हे पण पवार, स्थानिक आमदारदेखील पवार आणि प्रमुख पाहुणा म्हणून शरद पवार. इथेही पवारांचेच राज्य दिसतेय, असे ते म्हणताच सभास्थानी पुन्हा टाळ्या-शिट्ट्यांचा गजर झाला.

उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरविलेल्या या आखाड्यात महाराष्ट्राच्या विविध भागांबरोबरच हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश येथील शंभराहून अधिक नामवंत पहिलवानांनी आवर्जून हजेरी लावली. अंतिम फेरीतील सर्व कुस्त्या पवार यांनी पूर्ण वेळ देत बारकाईने पाहिल्या. पहिलवानांनी डाव टाकताच आजूबाजूला बसलेले आमदार ॲड. अशोक पवार व प्रकाश धारिवाल यांना टाळ्या देत त्यांनी पहिलवानांना उत्स्फूर्त दाद दिली. पहिलवानांची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात उतरताना त्यांनी पायातील बूट काढून ठेवत आखाड्याचे पावित्र्यदेखील आवर्जून राखले.

या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आमदार पवार व धारिवाल यांना धन्यवाद देताना पवारांनी मुख्य आयोजक, महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार, निमंत्रक पहिलवान अशोक पवार, आशिष शिंदे यांचेही कौतुक केले. कुस्ती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा व शान असून, पुरातन काळापासून देशातील सामान्य माणसाने ही कला जोपासली आहे. पूर्वजांची ही परंपरा कायम टिकली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष या नात्याने कुस्तीक्षेत्राशी माझा जुना व जवळचा संबंध आहे. पण आज या क्षेत्रात काहीशी उदासिनता दिसते. ती घालवताना, या क्षेत्राला प्रेरणा, प्रोत्साहन देणे ही माझ्यासह आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. शिरूरसारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय आखाड्याच्या माध्यमातून कुस्तीचे चांगले मैदान भरविले आहे. यातून देशात राज्याचा नावलौकीक तर वाढेलच पण यातून चांगले पहिलवान निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

राजकारणातील डाव मी आखाड्यातूनच शिकलो, असे आवर्जून नमूद करून पवार म्हणाले, राजकारण करीत असताना खेळ आणि राजकारण यात मी कधीच गल्लत होऊ दिली नाही. अनेक क्रीडा संघटनांचा अध्यक्ष असूनही क्रीडाक्षेत्र एका बाजूला आणि राजकारण एका बाजूला हे कटाक्षाने पाळले. मी राजकारणात असलो तरी खेळात कधीही राजकारण येऊ दिले नाही. राजकारणात डाव कसा टाकायचा, हे मात्र मी कुस्तीतूनच शिकलो, असे त्यांनी आवर्जून सांगितले तेव्हा आखाड्यात शिट्ट्या-टाळ्यांचा एकच गजर झाला.

आमदार पवार यांनी प्रकाश धारिवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहराचा वेगाने रचनात्मक विकास होत असल्याचे नमूद केले. ज्येष्ठ नेते विठ्ठल मणियार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, शिरूरचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह पंढरीनाथ पठारे, बाळासाहेब लांडगे, संदीप बारगुजे, अमोल बुचडे हे कुस्तीप्रेमीही उपस्थित होते.

युवा नेते आदित्य धारिवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संयोजक पहिलवान अशोक पवार यांनी प्रास्तविकात कुस्तीक्षेत्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या आखाड्याचे आयोजन केल्याचे सांगितले. आशिष शिंदे यांनी आभार मानले. बंडू गिरे, राजेंद्र भोसले, प्रवीण दसगुडे, हनुमंत गव्हाणे, कुशल सरोदे, किरण पाचर्णे यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. शंकर पुजारी यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने व राजू आवळे यांच्या उत्साही हलगी वादनाने या आखाड्यात वेगळीच रंगत भरली.

सिकंदर शेख याने स्पर्धेतील मानाची गदा मिळवली. त्याने पंजाबचा पहिलवान विकास काळा याला अस्मान दाखविले. महिला गटात नयना नेहवाल यांनी कोल्हापूरच्या रेश्मा मानेवर मात करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राचा बाला रफीक शेख व हरियाणाचा सोम बीर यांच्यातील तसेच महाराष्ट्राचा किरण भगत आणि दिल्लीचा रवी गांधडीया यांच्यातील लढतही लक्षवेधी झाली. त्यात बाला आणि किरणने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या लढतींवर कुस्तीप्रेमींनी बक्षिसांची खैरात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT