Bharat Gogawale birthday :
Bharat Gogawale birthday : Sarkarnama
पुणे

Bharatshet Gogawale Birthday: ओ भरतशेठ, तुम्ही नादच करताय थेट, तुमचा ‘बर्थ डे' लईच बेस्ट ; पण जी- 20 ची तयारी होतेय वेस्ट !

सरकारनामा ब्यूरो

Shinde group MLA Bharat Gogawale birthday : शिंदे-फडणवीस सरकारमधला 'वजन'दार आणि साऱ्या सरकार, प्रशासनात रुबाबात राहून एकहाती धाक ठेवणयाचा आटापिटा करणारा नेता म्हणजे, शिवसेनेचे नेते, आमदार भरत गोगावले. म्हणजे, राजकारणातले शेठ. या भरतशेठ गोगावलेंचा मंत्रालय, विधानभवनापासून बैठकांमधील वावर म्हणजे, एखाद्या शेठपेक्षा काय कमी नसतो. (Latest Marathi News)

कपाळी भलामोठा गंध, सोन्यांनी मढलेल्या हातात शुभ्र रुमाल, कुठेही 'एन्ट्री' करताना भोवती दोन-चार पोलीस, डझनभर कार्यकर्त्यांच्या गराडयासह शेठ हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो वा मुख्य सचिवांचे केबिनमध्ये धडक मारतात आणि हातातली कामे उरकतात.

सत्तासंघर्षातील याचिकांवरील निकालात शेठचे प्रतोदपद बेकायदा ठरविले गेले; पण त्याचा काडीचाही परिणाम न दाखविणारे शेठ अजूनही तेवढयाच दिमाखातच वावरतात. अर्थात, शेठना हे सगळे शोभतेही आणि सरकारमधले सारीच मंडळींना खपवून घेतात.

विधानभवनाच्या चहूबाजूंनी 'फ्लेक्सबाजी'

काही म्हणा, सगळीकडे माहोल करून शेठ आपली हवा करतात; ती कुठे कमी होऊ देत नाहीत, हे मात्र खरे. मग, या शेठचा वाढदिवस तर काय दणक्यातच साजरा झाला पाहिजे ना ? मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा, त्यातही शेठना कॅबिनेटची आशा आणि आजचा (ता. १ जून) वाढदिवस...हे जुळून आले आणि शेठच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाची संधी साधली. आपल्या लाडक्या शेठना शुभेच्छा देताना समर्थकांनी मुंबईत मंत्रालय आणि विधानभवनाच्या परिसरात चहूबाजूंनी 'फ्लेक्सबाजी' केली.

'जी- २०' परिषदेची तयारीच झाकली

मंत्रीमंडळात जाण्यासाठी ताटकळत असलेल्या शेठनी वाढदिवसानिमित्त स्वःपक्षीयांना ताकद दाखविण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 'फ्लेक्सबाजी'त तर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेची केलेली 'जी- २०' परिषदेची तयारीच झाकली गेलीय.

त्या ' जी-२०' परिषदेसाठी सजवलेल्या रस्त्यावर, झाडांवर, खांबांवरच शेठच्या वाढदिवसाचे ‘फ्लेक्स' लावले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या कल्पनेतून सजवलेल्या मुंबईतील सुशोभीकरणाची शेठ समर्थकांनी वाट लावून, शेठचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे उघडपणे दिसत आहे.

समर्थकांना कोण अडवणार ?

या परिषदेसाठी शहरे चकाचक करीत, त्यावर कोट्यवधी रूपये खर्च केला जात असतानाच, राजकारण्यांच्या अशा 'सेलिब्रेशन'मुळे मूळ उद्देशालाच धक्का बसत असल्याचे स्पष्ट आहे. मुळात, अशा प्रकारे बेकायदा फलकबाजी करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही, त्याकडे काणाडोळा करून फलक लावणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगाही उगारला जातो. पण इथे सरकारमधल्या शेठचाच त्यातही भरतशेठ गोगावलेंचा वाढदिवस म्हटल्यावर त्यांना आणि त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे टाकणाऱ्या त्यांच्या समर्थकांना कोण अडवणार ?, तसे धाडस कोणात आहे ?

शेठचा नाद 'लई डेंजर'

या फलकांवर कारवाई सोडा, पण साधा जाबही शेठ आणि त्यांच्या मंडळींना कोणी विचारू शकत नाही आणि तसे घडलेच तर त्याची खैर नसणार. हे मात्र नक्की ! म्हणूनच म्हणतात....शेठचा नाद 'लई डेंजर' ! शेठ आणि त्यांच्या समर्थकांबाबत काहीही असो; मात्र 'जी- २०' परिषदेसारख्या 'इव्हेंट'च्या काळात तरी, विद्रुपीकरण करण्याइतपचा बेजाबदारपणा कोणीच दाखवू नये आणि अशांचे हे लाड खपवून घ्यायला नकोच; पण हे शहाणपण कोण दाखविणार ?

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT