Pune News, 28 Jun : स्थावर मालमत्तेच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत, सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व गाजवण्यासाठी शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे आजी-माजी आमदार पुन्हा एकदा आमनेसामने ठाकले आहेत.
तब्बल नऊ वर्षांनंतर लागलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या तालेवार नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने शिरूरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी येत्या ५ जुलै रोजी मतदान होत असून, रिंगणात ५२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही थेट आणि चुरशीची लढत रंगणार आहे.
महायुती शेतकरी विकास पॅनेल: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत. (नेतृत्व: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आ. माऊली कटके)
स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत. (नेतृत्व: माजी आमदार अशोक पवार)
या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी महायुती धर्माचा नारा दिला असला, तरी शिरूर भाजपमध्ये मात्र उभी फूट पडल्याचे चित्र आहे. गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्रपक्षाने वेगवेगळी निवडणूक लढल्याने घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली होती.
त्यामुळे सुधीर ढमढेरे (तालुकाध्यक्ष, पश्चिम मंडल), संदीप भोंडवे (हवेली तालुकाध्यक्ष) महायुती सोबत आहेत. तर जयश्री पलांडे (ज्येष्ठ नेत्या), राहुल बाबूराव पाचर्णे (तालुकाध्यक्ष, पूर्व मंडल), भगवानराव शेळके, अरुण भुजबळ आणि एकनाथ शेलार. हे अशोक पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जात आहे. या बंडखोरीमुळे भाजपची शकले उडाली असून पक्ष 'आधे इधर, आधे उधर' अशा कात्रीत सापडला आहे.
लक्ष्मीदर्शन आणि घोंगडी बैठकांचा धुरळा
निवडणुकीत ईर्ष्या इतकी वाढली आहे की, गावोगाव घोंगडी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. रात्री-अपरात्री मतदारांच्या गुप्त गाठीभेटी घेतल्या जात असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी मिठाई वाटप, भेटवस्तू आणि 'लक्ष्मीदर्शनाचा' जोरदार वापर सुरू असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
नेत्यांच्या 'डोक्याचा भुगा'; बिनविरोधाचा प्रयत्न फसला!
या निवडणुकीसाठी सुरुवातीला तब्बल २६७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. जागा १८ आणि उमेदवार शेकडो, यामुळे नेत्यांची मोठी डोकेदुखी झाली होती. वरिष्ठ पातळीवरून दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपचे समसमान ५ प्रतिनिधी घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, "सभापती आणि उपसभापती पद कुणाकडे राहणार?" यावरून नेत्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने बिनविरोधाच्या प्रस्तावाला हरताळ फासला गेला. जागांचा समतोल साधताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या 'डोक्याचा पुरता भुगा' झाला.
सुसाट 'माऊली एक्सप्रेस' विरुद्ध पवारांची 'शांत खेळी'
माजी आमदार अशोक पवार यांनी गेल्या काही निवडणुकांतील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी अत्यंत शांतपणे आणि विचारपूर्वक पावले टाकत सर्वसमावेशक पॅनेल मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे, सततच्या विजयाने सुसाट सुटलेल्या 'माऊली एक्सप्रेस'मध्ये गावकारभाऱ्यांची संख्या वाढल्याने उमेदवारी देताना मोठी ओढाओढी झाली, तरीही त्यांनी 'स्ट्रॉंग' उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे.
अपक्षांची 'एकला चलो रे'ची भूमिका
महायुती आणि मविआच्या या थेट लढतीत संजय पाचंगे, संतोष दौंडकर, रामचंद्र नागवडे, हनुमंत शिवले आणि नाना फुलसुंदर या अपक्षांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेत आपली प्रचार यंत्रणा मजबूत केली आहे. अपक्षांच्या या शड्डूमुळे मुख्य पॅनेलच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले असून, ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आणखी किती रंगतदार वळण घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.