Ghodganga Sugar Factory Sarkarnama
पुणे

Ghodganga Sakhar Karkhana : घोडगंगा कारखान्याचं त्रांगडं सुटणार का? हंगामाबाबत काय होणार निर्णय? उद्याच्या सभेकडे लक्ष

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज निर्मिती करून विक्री झाली नसल्याने कारखान्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. यातून मार्ग काढताना कारखाना व्यवस्थापनास नाकीनऊ येत आहे. परिणामी कामगारांचा वर्षभर पगार देता आला नाही. त्यामुळे कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांसह तोडणी-वाहतूकदारांची देणी देताना मोठी कसरत करावी लागली. घोडगंगाचे हे त्रांगडं सुटून यंदा कारखान्याचा गाळप हंगाम होणार का, अशी शंका शेतकऱ्यांसह कामगारांनी व्यक्त केली आहे. (Latest Political News)

घोडगंगा साखर कारखान्याची वार्षिक सभा शुक्रवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने तयारी केली आहे. या सभेत सभासद शेतकऱ्यांनीही आपले प्रश्न मांडणार आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे यंदा कारखाना सुरू होणार का, हाच कळीचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच एफआरपीशिवाय किती रक्कम वाढवून देणार, याबाबतही शेतकरी चर्चा करणार आहेत. तालुक्यात सध्या दहा लाख टनाहून अधिक ऊस आहे. भौगोलिक परिस्थिती चांगली आहे, गेल्या २५ वर्षांपासून कारखान्यावर एकहाती कारभार आहे, मात्र इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी दर का दिला जातो, यावर शेतकरी कारखाना प्रशासनाला घेरण्याची शक्यता आहे.

कारखाना अडचणीत असल्याचे कारण देत कामगारांचे वर्षभराचे पगार थकलेले आहेत. शेतकरी आणि वाहतूकदारांची देणी देण्यासाठी आंदेलनातही कामगारांनी कारखान्याला मदत केली. चर्चा करण्याची तयारी आहे, मात्र कारखाना व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कामगार आंदोलन करत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप साखर कामगार नेते शिवाजीराव काळेंनी यांनी केला आहे. त्यामुळे या सभेत कामगारांच्या थकलेल्या पगारावर काय तोडगा काढणार, याचीही उत्सुकता जिल्ह्याला आहे. दरम्यान, प्रशासन आणि कामगारांत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, तत्कालीन महायुती सरकारने कारखान्याने तयार केलेली वीज खरेदी करार (पीपीए) वेळेत केला नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यानंतर बँकांकडून कर्ज काढण्यासाठी कारखान्याने प्रयत्न केला. मात्र कामगारांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करून देण्यात आडकाठी आणल्याचा आरोप व्यवस्थापनाने केला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा, एका महिन्याचा पगार घेऊन काम सुरू करावे, या प्रस्तावावर कारखाना ठाम आहे. आमचीही चर्चेची तयारी असल्याचे कारखाना सांगत आहे. आता कामगार आणि प्रशानस चर्चेस तयार असतानाही नेमके कुठे अडतेय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारखान्याची स्थिती, कामागारांचे रखडलेले पगार आणि कारखाना सुरू होणार की नाही, अशी शेतकऱ्यांना असलेल्या शंका, याची उत्तरे शुक्रवारी होणाऱ्या सभेतच मिळणार आहेत. विविध विषयांवरून ही सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सभेकडे शेतकरी, कामगार यांच्यासह शिरूरकर आणि जिल्ह्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT