Sunil Shelke Vs Dilip Mohite : पवनानंतर मावळात जाधववाडी धरणाचे पाणी पेटणार!आमदार सुनील शेळके-दिलीप मोहिते भिडणार

Jadhavwadi Dam And Bhama Askhed Dam : भामा आसखेडचे पुणे, पिंपरी-चिंचवडला मिळणारे पाणी बंद करण्याचा इशारा...
Dilip Mohite, Sunil Shelke
Dilip Mohite, Sunil ShelkeSarkarnama

Pune Political News : मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या अजित पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टला शेतकऱ्यांनी कड़ाडून विरोध केला. त्यासाठी त्यांनी ९ ऑगस्ट २०११ रोजी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे रोखून धरल्याने पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार, तर सात जण जखमी झाले होते. परिणामी हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. आता मावळातीलच जाधववाडी धरणातून शेजारच्या खेड तालुक्यातील चार गावांना बंद जलवाहिनीतून पाणी देण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे पवना धरण आंदोलनाच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आहेत. (Latest Political News)

दरम्यान, पवनेनंतर आता जाधववाडी धरणाचेही पाणी पेटण्याची भीती आहे. त्यावरून राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite) आणि मावळचे सुनील शेळके एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शेळके हे मावळच्या भूमिपुत्रांच्या मागे उभे राहिले आहेत, तर त्याला मोहितेंनी विरोध केला आहे. खेडला पाणी मिळण्यावर ते ठाम आहेत.

या दोन्ही सत्ताधारी अण्णा आमदारांच्या भांडणात, ही योजना राबविणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मात्र गोची झाली आहे. हा प्रकल्प १२० कोटी रुपये खर्चाचा असून, त्याचे तीस टक्के काम झालेले आहे. त्यानंतर आता हा विरोध सुरू झाल्याने त्याचे पुढील भवितव्य लटकले आहे. चारशे कोटी रुपयांच्या पवना बंद जलवाहिनीचेही काम सुरू होऊन त्यावर दीडशे कोटी रुपये खर्ची पडले होते. त्यानंतर तो प्रकल्पच बंद पडल्याने जनतेचे हे पैसे पाण्यातच गेल्याची चर्चा आहे.

Dilip Mohite, Sunil Shelke
Dharashiv Politics : उमरग्याचा पॅटर्नच वेगळा; भाजप जिल्हाध्यक्षांच्या सत्काराला कम्युनिस्ट, शिवसैनिक अन् काँग्रेसीही...

खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द, मरकळ, गोलेगाव, वडगाव घेनंद या चार गावांसाठी मावळातील जाधववाडी धरणातून थेट पाणी उचलण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेळकेनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात त्यांनी मावळातील गावांना आवश्यक पाण्याचा सविस्तर तपशील घेतल्याशिवाय परस्पर निर्णय घेऊ नये, असे अधिकाऱ्यांना बजावले. चऱ्होली व इतर गावे इंद्रायणी नदीलगत असल्याने त्यांच्यासाठी इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्याचा पर्याय त्यांनी सूचवला.

बैठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, जाधववाडी धरणाच्या पाण्यावर नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, इंदोरी तसेच सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे ही गावे अवलंबून आहेत. या भागातील औद्योगिक क्षेत्र आणि वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करता भविष्यात या परिसरात अधिक पाण्याची गरज भासणार आहे. सध्याचा होणारा पाणीसाठा ऐन उन्हाळ्यात अपुरा पडत आहे. त्यातच धरणातील पाणी थेट तालुक्याबाहेर नेले जात असेल, तर अतिरिक्त पाणी कोठून आणायचे? चऱ्होली व इतर गावांलगत इंद्रायणी नदीचा प्रवाह असूनही जाधववाडी धरण ते चऱ्होली अशी सुमारे ३३ किलोमीटर अंतर पाइपलाइन का टाकली जात आहे?,' असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

खेड तालुक्यातील चार गावांना जाधववाडी धरणाचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका खे़डचे आमदार दिलीप मोहिते यांनी `सरकारनामा`शी बोलताना मांडली. जाधववाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन आमच्याकडे झाले. त्यांचे गावठाण आमच्याकडे आहे, मग धरणाचे पाणी आम्हाला का नाही, असा सवाल त्यांनी केला. (Maharashtra Political News)

मोहिते पाटील म्हणाले, 'चासकमान धरण तालुक्यात असले, तरी त्याचे बहुतांश पाणी शिरूर तालुक्यात जात आहे. तसेच भामा-आसखेड धरणाचेही आहे. तेथील पाणीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडला बंद जलवाहिनीतून नेण्यात आले आहे. अशाप्रकारे सगळे जण आणि सगळ्याच बाजूने खेड तालुक्यावर अन्याय होत असेल, तर तो किती दिवस सहन करणार? असा संताप त्यांनी व्यक्त केला. 'जाधववाडीचे पाणी मिळाले नाही, तर नाईलाज म्हणून भामा-आसखेड धरणातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाणारे पाणी अडवावे लागेल,' असा इशाराही मोहिते पाटलांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dilip Mohite, Sunil Shelke
Chandrapur ZP Bribe Case : आजारी रजा मंजूर करण्यासाठी शिक्षकाला मागितली लाच, शिक्षणाधिकारी अडकला जाळ्यात !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com