Pune News : केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या, हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला आहे, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले विरोधक शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे सोमवारी ( 22 एप्रिल) आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हे म्हणाले, 2024 ची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, या निवडणूक प्रचारात धोरणात्मक मुद्द्यांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती. मात्र, खोटं बोल पण रेटून बोल, या सवयीबरोबरच पंधरा वर्षांच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टीका केली जात आहे, असे प्रत्युत्तर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर न जाता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे. कोल्हे यांच्या भूमिकेने दुखावलेल्या अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. शिरूरच्या उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच, असे अजित पवार यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमामधून बोलून दाखविले आहे. अजितदादांनी दिलेल्या आव्हानामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचेच मोठे लक्ष लागले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच आढळराव कोल्हे यांच्यावर टीका करत आहेत. खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर आढळराव पाटील यांच्याकडून सातत्याने वैयक्तिक टीका केली जात आहे.
त्यावर उत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत धोरणात्मक बाबींवर बोलावं, पण त्यांच्याकडे वेगळे मुद्देच नाहीत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे तीच तीच वाक्यं फिरवून ते बोलतायत. पंधरा वर्षांतल हे त्यांचं अपयश आहे. पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या पोराने काम मार्गी लावली, त्याची ही पोटदुखी आहे, असा टोलादेखील डॉ. कोल्हे यांनी लगावला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.