Balasaheb Dangat, Udhav Thackeray
Balasaheb Dangat, Udhav Thackeray sarkarnama
पुणे

Shivsena News : जुन्नरसाठी शिवसेना आग्रही; शिवनेरीवर पुन्हा भगवा फडकविणार

सरकारनामा ब्यूरों

- गणेश कोरे

Pune Shivsena News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात झालेल्या उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात जुन्नरच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. या तालुक्यात सर्वाधिक मतदार ठाकरे गटाकडे असल्याने याबाबतचा ठराव करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे जुन्नरची जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.

जुन्नर तालुका शिवसेना (ठाकरे गटाचा) मेळावा नुकताच नारायणगाव येथे झाला. या मेळाव्याला माजी आमदार आणि जुन्नर आंबेगाव तालुक्याचे समन्वयक बाळासाहेब दांगट, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुका संपर्कप्रमुख दिलीप बाह्मणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर, संभाजी तांबे, युवासेनेचे संदीप शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, नारायणगांवचे उपसरपंच बाबू पाटे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले,‘‘ जुन्नर तालुक्यात शिवसेना तळागाळात रुजली आहे. तालुक्यात बाळासाहेब दांगट दोन वेळा आमदार होते. यानंतर शिवसेनेतून मनसेत जाऊन शरद सोनवणे आमदार झाले, तर शिवसेनेच्याच आशाताई बुचके भाजपत आहेत. गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये तीन वेळा शिवसैनिकच विजयी झाले असून, शिवसेनेचे दोन वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.

जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) पारंपरिक मतदार असून, पक्षफुटीनंतरही मतदार बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा आहे. यामुळे तालुक्यात सर्वाधिक मतदार हा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने विधानसभेला महाविकासआघाडीत जुन्नरची जागा शिवसेनेनेला द्यावी.

पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायतीदेखील शिवसेनेच्या ताब्यात आहेत. २००२ मध्ये ८ पैकी ५ जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या ताब्यात होते. यामुळे पक्षाची पाळेमुळे जनमाणसांशी जुळली असल्याने विधानसभेला आम्हीच विजयी होणार असल्याने जुन्नरची महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला द्यावी.

तालुकाप्रमुख माऊली खंडागळे म्हणाले,‘‘ शिवसेनच्या फुटीनंतरही कडवट शिवसैनिकांसह सर्वसामान्य मतदार आणि जनता शिवसेनेसोबत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या मतदारांचा विचार करता, सर्वाधिक मतदार शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे आम्ही जुन्नरच्या जागेसाठी आग्रही आहोत. शिवनेरीवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.‘‘

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT