CM Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदेंचा पुण्यातील गुंडासोबतचा फोटो व्हायरल; राऊतांनी टाकलेला बॉम्ब साळींवर फुटणार का?

सरकारनामा ब्यूरो

Pune News : राजकारणी विशेषत: सत्ताधारी पक्षातील नेते आणि ‘गुन्हेगारी’ जगतातील नामचीन गुंडांच्या गाठीभेटीचे फोटो ‘व्हायरल’ करीत, सत्ताधाऱ्यांना उघडे पाडण्याचा विडाच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी उचलला आहे. आधी खासदार श्रीकांत शिंदे आणि कुख्यात हेमंत दाभेकर, त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील गुंड नीलेश घायवळचा एकत्रित फोटो, रील दाखवून राऊतांनी गेली दोन दिवस शिंदेंना ‘टार्गेट’ केले. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पुण्यातील गुंड जितेंद्र जंगमच्या शिवसेनेतील प्रवेशाचा फोटो उघड केला आहे. (Shiv Sena News)

राऊतांनी (Sanjay Raut) ट्विट केलेल्या फोटोमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील युवा सेनेचे सचिव किरण साळी (kiran sali) दिसत आहेत. त्यामुळे साळींनीच पतंगेंचा प्रवेश घडवून असल्याकडे बोट दाखवले जात आहे. गुंडासोबतचे सलग तीन फोटो पुढे आल्याने शिंदेंची (CM Eknath Shinde) डोकेदुखी वाढली असली; तरी साळींच्या पुढाकारातील जंगमचा पक्षप्रवेश शिंदेंसाठी तापदायक ठरला आहे. त्यामुळे दाभेकरला वर्षावर आल्याने अनिकेत जावळकरला युवा सेनेच्या पदावरून काढले; तोच न्याय करीत आता किरण साळींना काय शिक्षा केली जाणार, असा सवाल केला जात आहे. एकूण, मुख्यमंत्री शिंदे आणि जंगमचा फोटो किरण साळींच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, किरण साळी यांनी फोटो व्हायरल झाल्यानंतर 'सरकारनामा' प्रतिनिधीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. जितेंद्र जंगम (Jitendra Jangam) यांच्याविरोधात हाणामारीच्या घटनेचे किरकोळ गुन्हे असल्याचे सांगून साळींनी कहरच केला. मुळात तो ठाकरे यांच्या काळात शिवसेनेत होता. हा फोटो जुना आहे, तो व्हायरल करण्याआधी खातरजमा करायला हवी होती, असा सल्ला देताना साळींनी राऊतांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्नही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किरण साळी म्हणतात...

कसबा पोटनिवडणुकीवेळी विविध समाजांचे मेळावे घेण्यात आले होते. यादरम्यान शेकडो प्रवेश शिवसेनेत झाले. त्यावेळी जंगमचाही प्रवेश करण्यात आला. जितेंद्र जंगम हा पूर्वीपासून उद्धव ठाकरे गटामध्ये सक्रिय कार्यकर्ता होता. त्या पक्षात असताना त्याच्यावर मारामारीसारखे किरकोळ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाही आणि त्याने शिवसेना प्रवेश केल्यानंतर एका वर्षात त्याच्यावर अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही, असे साळींनी स्पष्ट केले आहे.

काल झालेल्या पोलिस परेडमध्येदेखील गंभीर गुन्हे नसल्याने त्याला बोलावण्यात आलं नव्हतं. संजय राऊत हे कोणतीही शहानिशा न करता सामान्य गल्लीतील मुलाला ट्विट करून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध करत आहेत. असे फोटो व्हायरल करण्यापूर्वी त्यांनी शहानिशा करणे आवश्यक असल्याचं किरण साळी यांनी म्हटले आहे.

राऊत काय म्हणाले?

गुंडाचा फोटो ट्विट करताना राऊतांनी म्हटले आहे की, पुण्याचे नवे पोलिस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे. काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोक्कामधून नुकताच बाहेर आला आहे.महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य असल्याची टीका राऊतांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT