Pune News : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिले. या निर्णयानंतर अजित पवार गटात जल्लोष साजरा केला जात आहे, तर पुढील रणनीती आखण्यासाठी शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. याच दरम्यान आज पुण्यातील राष्ट्रवादी भवन येथे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अवघे 100 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (NCP Crisis News)
विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिले आहे, तर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाला नवीन नाव देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. शरद पवार गटाने आपला पक्ष आणि चिन्ह ठरवण्यासाठी 7 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्याचे आयोगाने सांगितले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सर्वत्र बैठकांचे सत्र सुरू आहे. अशाच प्रकारच्या बैठकीचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या दोन्ही आमदारांनी अनुपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार सुनील टिंगरे हे पूर्वीपासूनच अजित पवारांसोबत होते.
मात्र हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ते केव्हा अजित पवारांच्या व्यासपीठावर तर केव्हा शरद पवार गटाच्या व्यासपीठावर दिसत होते. त्यामुळे ते या बैठकीत उपस्थित राहणार का आणि काय येणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली. मात्र या बैठकीमध्ये चर्चेचा विषय होता तो म्हणजे माजी नगरसेवकांची अनुपस्थिती.
मागील महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 50 नगरसेवक महापालिकेत होते. राष्ट्रवादीमधील पडलेल्या फूटीनंतर यातील बहुतांश नगरसेवक हे तटस्थ असल्याचं पाहायला मिळालं. बहुतांश नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. या नगरसेवकांनी दोन्ही व्यासपीठावर जाणं टाळलं होतं. पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय झाल्यानंतर आपल्या भूमिकेबाबत स्पष्टता करू, असं ते खासगीमध्ये बोलत असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं.
आता चिन्हाबाबत निर्णय झाल्यानंतर या माजी नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुकादेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवार गटाच्या बैठकीला शहराध्यक्ष प्रशांत जगताप वगळता एकाही माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावली नाही.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.