Chief Minister Eknath Shinde News, Shivsena News
Chief Minister Eknath Shinde News, Shivsena News Sarkarnama
पुणे

शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; मुख्यमंत्री लवकरच पुण्यात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या अनेक भागातील पदाधिकारी त्यांच्या गटात जाण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. पुण्यातही शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यासह पाच माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

पुण्यात 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये नाना भानगिरे यांचाही समावेश होता. आता त्यांच्यासह आणखी चार नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचे समजते. तसेच पक्षाचे अन्य काही पदाधिकारीही त्यांच्यासोबत शिंदेंची साथ देऊ शकतात. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसणार आहे.

दरम्यान, भानगिरे हे मुंबईत तळ ठोकून आहेत. तेही शिंदे गटात सामील होणार असल्याचे समजते. भानगिरे यांच्यासारख्या नेत्याला फोडून महापालिका निवडणुकांआधी (Municipal Corporation) शिंदे हे शिवसेनेला आणखी धक्के देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येत्या काही दिवसात पुण्याचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्यात सेनेचे काही पदाधिकारी देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाना भानगिरे यांची शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे समजते. दोघांची आज सायंकाळी भेट होण्याची शक्यता आहे. भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टाकली जाऊ शकते. तसं झाल्यास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आणखी काही नेते शिंदे गटात सामीन होऊ शकतात. ते शिवसेनेकडून पुणे मनपामध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. (Pune Latest Marathi News)

पुणे महापालिकेत प्रशासन आल्यानंतर निधी अडविल्याची तक्रार करीत भानगिरे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाव घेतली; त्यानंतर शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमारांशी बोलून निधी देण्याचा आदेश दिला. भानगिरेंच्या फोनाफोनीने विक्रम कुमारांनीही तब्बल दीडशेपेक्षा अधिक कोटी रुपयांचा निधी दिला. शिंदे आणि भानगिरे यांच्यातील जवळीक दिसून आली. शिंदे यांच्याकडे आपल्या शब्दाला 'वजन' असल्याने भानगिरे खूष आहेत. त्यामुळे भानगिरे हे शिंदेंकडे आकर्षित होऊन, त्यांच्या गटात दाखल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पुणे महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर तीनवेळा नगरसेवक झालेल्या भानगिरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची भानगिरेंची इच्छा आहे. ती पूर्ण व्हावी म्हणून विधानसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी नशीब अजमावले. त्यानंतर पुन्हा महापालिका आणि पुण्यातील शिवसेनेवर पकड ठेवण्यासाठी भानगिरे हे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या 'गुड बुक' राहिले.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांआधी शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर भानगिरे हे मुंबईत शिंदेंच्या मदतीला होते. या संघर्षात शिंदेंनी दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर मात्र, शिंदे यांनी बंड केल्यानंतर भानगिरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, पुण्यात अहिरांच्या उपस्थित झालेल्या बैठकांना भानगिरे यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांच्या मनात शिंदेचेही आकर्षण कायम असल्याचे लपून राहात नव्हते. त्यामुळे भानगिरेंची भूमिका काय, यावर पुण्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या.

शेवटी शिंदेंचे बंड यशस्वी झाले; ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतही बसले. तेव्हाच, पुणे शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून भानगिरे यांनी शिंदेंकडे निधीची मागणी केली. त्यानंतरच्या काही मिनिटांतच शिंदेंनी विक्रम कुमारांशी चर्चा केली आणि दीडशे कोटींच्या निधीची घोषणा झाली. त्यावरून शिंदेंच्या आभारासाठी भानगिरे मुंबईत दाखल झाले. तेव्हाच, त्यांना आपल्या गोटात ठेवण्यासाठी शिंदेंनी गळ घातल्याचे सांगण्यात आले. त्यावरून भानगिरेंनी अद्याप पत्ता उघड केला नाही. मात्र, ते पुढच्या काही दिवसांत या गटात दाखल होऊन, पुण्यात शिंदे गटाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT