Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : आढळराव-मोहिते, कोल्हे-लंके भेट, पण कुणाची डाळ शिजणार? पुण्याच्या राजकारणात धुरळा

उत्तम कुटे

Pune Political News : शिंदे शिवसनेचे उपनेते, शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि अजित पवार गटाचे खेड आमदार दिलीप मोहिते-पाटील या कट्टर राजकीय शत्रूंची भेट रविवारी (ता. 10) दिवसभर चर्चेची ठरली. तर, शिरुरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि पारनेरचे (जि. नगर) अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात सोमवारी (ता. 11) पुण्यात झालेल्या भेटीनेही तसाच मोठा राजकीय धुरळा उडवून दिला.

तीनवेळा शिरुरचे खासदार राहिलेले आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) यांचा चौकार गतवेळी कोल्हेंनी हुकवला. ते यावेळी महायुतीकडून तीव्र दावेदार आहेत. ही इच्छा त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यासाठी ते गेले पाच वर्षे पायाला भिंगरी लावल्यागत मतदारसंघात फिरत आहेत.

खासदार नसतानाही दर रविवारी जनता दरबार घेत आहेत. पण, युतीत नव्याने आलेले अजित पवार यांनी शिवसेनेच्या वाट्याच्या शिरुरवर यावेळी दावा ठोकला. त्यामुळे आढळरावांची दावेदारी डळमळीत झाली. त्यातच त्यांच्या दावेदारीला राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे-पाटील आणि आमदार दिलीप मोहिते-पाटलांनी कडाडून विरोध केला. त्यातूनच त्यांनी ही भेट घेतल्याचे समजते.

मोहितेंच्या (Dilip Mohite) कार्यालयात नाही, तर गर्दी ओसरल्यानंतर परवा रात्री नऊ वाजता त्यांच्या निवासस्थानी जाऊन आढळरावांनी ही भेट घेतली हे विशेष. ती सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्तर मोहितेंनीही दिले. प्रत्यक्षात या दोघा राजकीय नेत्यांची ती सदिच्छा नाही, तर राजकीय आडाखे, व्यूहरचनेसाठी भेट असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आढळरावांची पुणे म्हाडाच्या सभापतीपदी वर्णी लागल्याने त्यांचा उमेदवारीचा सूर थोडा मवाळ झाला असला, तरी तिकिटाची आशा त्यांनी सोडलेली नाही. तेच या भेटीने स्पष्ट केले आहे. मोहितेंचा विरोध संपवून उमेदवारीच्या वाटेतील मोठा अडथळा दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, मोहितेंनी भूमिका कायम ठेवल्याने त्यात यश आले नाही. ते आले असते, तर कदाचित त्यांनी नंतर लांडे यांचीही अशीच भेट घेतली असती. (Latest Political News)

खेडमधील मोहिते-आढळराव भेटीची चर्चा थांबायच्या आतच सोमवारी पुण्यात कोल्हे (Amol Kolhe) आणि लंके या सध्या टोकाचा संघर्ष सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीतील आमदार-खासदारांच्या भेट झाली. त्याबाबतही कोल्हेंनी वेट अॅन्ड वॉच अशी सावध प्रतिक्रिया दिली. तर, लंकेनी भेटीमागील सस्पेन्स उघड होऊ दिला नाही. उलट तो आणखी वाढवला. त्यातून लंके हे शरद पवार राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला.

दरम्यान, लंके (Nilesh Lanke) खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे समोर आलेले आहे. कोल्हेंच्या मागणीनुसार कोल्हेंनी आपल्या स्वराज्यरक्षक संभाजी हा ऐतिहासिक प्रयोग केले आहेत. यातूनच मतांची गोळाबेरीज करण्याचा उद्देश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. आता लंकेंना खासदारकी लढवायची असेल तर घरवापसी करावी लागणार आहे. यातचून शरद पवारांचे विश्वासू खासदार डॉ. कोल्हेंनी लंकेची ही भेट घेतल्याचे समजते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT