Shivsangram Sarkarnama
पुणे

Shivsangram Sanghtana : 'निवडणुका शांततेत पार पाडायच्या असतील तर ...' ; शिवसंग्राम संघटनेचा इशारा!

Chaitanya Machale

Pune News : भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसंग्राम संघटना संलग्न असली, तरी सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा समजाच्या आरक्षण आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे शिवसंग्राम संघटनेने मंगळवारी जाहीर केले. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबत शिवसंग्राम संघटनेची भूमिका काय? असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, आरक्षण हा मराठा समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी देखील मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आरक्षण जाहीर देखील केले होते, मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण रद्द झाले. मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, त्यामुळे आमचा त्यांना पाठिंबाच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राज्यकर्त्यांना या निवडणुका शांततेच्या मार्गाने आणि निकोप वातावरणात पार पाडायच्या असतील, तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे.

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी घेतली आहे. ती त्यांनी पूर्ण करावी, अशी विनंती त्यांना असणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ विरोध करत आहेत. यावर बोलताना तानाजी शिंदे म्हणाले, त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजावले पाहिजे. जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी आमची देखील आहे.

शिवस्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष ही वस्तुस्थिती -

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे जलपुजन होऊन सात वर्षे झाली. याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याची टीका शिवसंग्राम संघटनेने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हेच पूजन झाले होते. राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने स्वर्गीय विनायक मेटे यांचे स्वप्न अपूर्ण आहे. काम रखडले ही वस्तुस्थिती असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

महायुतीत सहभागी झालेल्या घटक पक्षांची संख्या चार वरून आता 11 झाली असून सत्तेत केवळ तीनच पक्ष आहेत. उर्वरित घटक पक्षांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे, याकडे भाजपने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ अशी शिवसंग्राम ची सुरुवातीपासून भूमिका राहिली असून आजही आम्ही भाजप सोबत आहोत, असे शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT