avinash salave congress sarkarnama
पुणे

Pune Congress : अरविंद शिंदेंचे 'सिक्रेट मिशन'! ठाकरेंचा मोहरा लावला गळाला, रमेश बागवेंवर कुरघोडी?

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील एका पक्षप्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. एखाद्या 'सिक्रेट मिशन'प्रमाणे हा पक्षप्रवेश घडून आणण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटात असलेल्या माजी नगरसेवकाचा अत्यंत गुप्तता पाळत शुक्रवारी ( 9 ऑगस्ट ) काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश होताना इतकी गुप्तता पाळण्यात आली होती की या प्रवेशाबाबत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांना देखील कुणकुण नसल्याचं समोर आलं आहे.

गेला काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरून गटबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा ( Congress ) एक गट सातत्याने पक्ष श्रेष्ठींची भेट घेत पुण्यातील शहराध्यक्ष पदावर नवीन कार्यकर्त्याची नेमणूक करण्याची मागणी करत आहे. सध्याचे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांना बदलण्याची मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश बागवे करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बागवे हे पुन्हा एकदा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

एकीकडे काँग्रेसचं शिष्टमंडळ शहराध्यक्ष बदलाची मागणी करण्यासाठी राज्यातील आणि दिल्लीतील वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चार टर्म नगरसेवक राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटातील अविनाश साळवे यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून घेतला आहे.

हा पक्ष प्रवेश करून घेताना अविनाश साळवे यांना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या विधानसभा मतदारसंघातून रमेश बागवे हे इच्छुक आहेत. त्याच विधानसभा मतदारसंघाचे आश्वासन देऊन अविनाश साळवे यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून घेतल्याने अरविंद शिंदे यांनी बागवे यांना शह देण्यासाठीच हा पक्ष प्रवेश करून घेतला असल्याचं चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

या पक्षप्रवेशावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे वगळता शहरातील इतर कोणताही मोठा काँग्रेसचा नेता उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले. पक्षप्रवेशाला कोणतीही आडकाठी येऊ नये म्हणून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कुणालाही कानोकान खबर लागू न देता थेट प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्र प्रभारी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.

या पक्षप्रवेशामुळे एकीकडे काँग्रेसची अंतर्गत गटबाजीला खतपाणी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता अशा प्रकारे पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गटात देखील नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महाविकास आघाडीत देखील या पक्षप्रवेशामुळे वादाची ठिणगी पडू शकते.

'सरकारनामा'शी संवाद साधताना अविनाश साळवे म्हणाले, "मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी महाविकास आघाडीचाच भाग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रति माझ्या मनात आत्ताही तेवढाच आदर आणि सन्मान आहे. मला शिवसेनेमध्ये खूप सारं प्रेम मिळालं आहे. काही कारणांसाठी पक्ष सोडला असला, तरी माझा तो आदर कमी पडणार नाही. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक होतो. त्यानुसार काँग्रेसकडून मला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचं आश्वासन देणारा प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतर मी हा पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

"2017 मध्ये मला शिवसेनेकडून नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यापूर्वी मी 'आरपीआय' गवई गटाकडून दोन निवडणुका लढल्या आणि जिंकलो आहे. तसेच, एकदा काँग्रेसच्या चिन्हावर देखील निवडणूक लढवून जिंकली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत चार टर्म नगरसेवक म्हणून काम करण्याचा तगडा अनुभव माझ्याकडे आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी काँग्रेसमध्ये दाखल आहे," असं साळवे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT