Shivsena UBT Pune Sarkarnama
पुणे

Shivsena UBT Pune Vs Rane : केंद्रीय मंत्र्यांसाठी एक आणि इतरांना वेगळा न्याय, हेच पुणे महापालिकेचं धोरण? - ठाकरे गटाचा सवाल!

Pune Municipal News : राणे यांनी पैसे न भरल्यास आम्ही भीक मागून त्यांना थकबाकी भरण्यासाठी पैसे देऊ, असा इशाराही दिला आहे.

Chaitanya Machale

Pune Political News : पुणे महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी न भरणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी संबंधित असलेल्या मॉलवर कारवाई करत महापालिकेने हा मॉल सील केला. या मॉलच्या नावावर महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी शिल्लक असतानाही केवळ 25 लाख रुपये भरल्यानंतर अवघ्या एक दिवसात पालिकेने हा मॉल पुन्हा खुला केला आहे.

त्यामुळे संपूर्ण थकबाकी न भरता निम्म्यापेक्षाही कमी पैसे भरूनही मॉल सुरू झाल्याने, केंद्रीय मंत्र्यांसाठी एक आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय, असं पुणे महापालिकेचं धोरण आहे काय? असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कारण, सर्वसामान्य नागरिकाकडे मिळकतकराची थकबाकी असल्यास संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय मंत्री राणे यांच्या कुटुंबियांच्या नावाने असलेल्या मॉलला ही सवलत देण्यात आल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सत्ताधारी पक्षात असलेल्या केंद्रीय मंत्री राणे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला वेगळा न्याय आणि पुणेकरांना वेगळा न्याय का? असा प्रश्‍न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) पक्षाच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुटे यांनी याबाबत विचारणा केली आहे. तसेच पालिकेच्या मिळकत कर विभागाचा पदभार असलेले उपायुक्त माधव जगताप यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना परिसरात राणे कुटुंबियांचा मॉल आहे. या मॉलकडे महापालिकेची तीन कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरावी यासाठी पालिकेने यापूर्वीच या मॉलला नोटीस बजावत कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही थकबाकी न भरल्याने पालिकेने या मॉलचे दोन मजले सील केले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी संबंधित असलेल्या या मिळकतीवर पालिकेने सील ठोकल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर एका दिवसात पालिकेकडे 25 लाख रुपये भरण्यात आले. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने मिळकत कर लावल्याची तक्रार आल्याचे निमित्त करत पालिका प्रशासनाने कारवाई करत लावलेले सील काढून देखील टाकले. महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर वरिष्ठ पातळीवर प्रशासनावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे पंचवीस लाख रुपये जमा करून घेत प्रशासनाने ही मिळकत खुली केली आहे.

पालिकेने घेतलेल्या या भूमिकेवर शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या दबावाखाली महापालिकेने ही कारवाई मागे घेतल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निर्णयामुळे पालिकेने स्वतःचेच नुकसान करून घेतले आहे. संपूर्ण थकबाकी न भरता मॉलला लावण्यात आलेले हे सील कसे उघडले त्यावर लेखी खुलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

एवढच नाही तर राणे यांनी पैसे न भरल्यास आम्ही भीक मागून राणे यांना थकबाकी भरण्यासाठी पैसे देऊ, असा इशाराही शहर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री राणे यांना लावलेला न्याय इतर थकबाकीदारांना देखील लावण्यात यावा, अशी मागणी ही केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT