Pimpri Police, Crime News
Pimpri Police, Crime News Sarkarnama
पुणे

धक्कादायक! देहूरोडला शाळकरी मुलगी विकतेय गावठी दारू

उत्तम कुटे

पिंपरी : मावळ तालुक्यातील (जि.पुणे) व त्यातही कामशेतमधील अवैध गावठी दारुभट्या बंद करण्यासाठी स्थानिक आमदार (मावळ) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी या महिन्याच्या २१ तारखेला गावठी दारुचे कॅन घेऊन कामशेत पोलिस ठाण्यावर महिलांसह शेकडोंचा धडक मोर्चा नेला होता. त्यानंतर या गावठा दारूच्या हातभट्या व विक्रीवर वरवरची कारवाई पोलिस व अबकारी विभागाने केली. मात्र, मावळ मतदारसंघात व लगतच्या हवेली तालुक्यातही गावठी हातभट्या व ही दारू विक्री जोरातच आहे. देहूरोड येथे, तर चक्क शाळकरी मुलगीच हातभट्टी विकत असल्याचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांची (Pimpri Police) झोप उडाली आहे. (Pimpri Police, Crime News)

या महिन्याच्या २ तारखेला मावळातील कोथूर्णे येथील सात वर्षाच्या बालिकेवर दारूच्या नशेतील तरुणाने अत्याचार करून तिचा खून केला होता. त्यामुळे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच आमदार शेळके यांनी गावठी हातभट्या व गावठी दारूविक्री बंद करण्यासाठी कामशेत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून या बेकायदेशीर धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कामशेत पोलिस ठाण्याच्या पीआयची तातडीने बदली करण्याची मागणी केली होती. पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सबंधित पीआयवर २४ तासांत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र,आठ दिवसानंतर सुद्धा या पीआयची बदली झालेली नाही.

दुसरीकडे पुणे ग्रामीणमधील कामशेत पोलिस ठाण्याच्या बाजूच्या देहूरोड या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टीतील गावठी दारुविक्री आता समोर आली आहे. तेथील एका अड्यावर, तर शाळकरी मुलगी गावठी दारू विकत असल्याचे दिसून आले. हे स्टींग ऑपरेशन आरटीआय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन व त्यांच्या टीमने परवा (ता.२६ ऑगस्ट) केले. त्यांनीच हा व्हिडिओ नंतर व्हायरल केला. तो त्यांनी आयुक्त अंकुश शिंदे यांनाही पाठवला. त्यानंतर डीसीपी (झोन टू) आनंद भोईटे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश आता दिले आहेत. या व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र देहूगावाच्या जवळच असलेल्या देहूरोडमध्ये अवैध धंदे जोमात आहेत. तेथील एका महिलेचा मुलगा नशेचा बळी ठरला. त्यामुळे तिने त्याविरोधात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. पण, ती व्यर्थ ठरली. दरम्यान, हे प्रकरण समजल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी हे स्टिंग ऑपरेशन एमव्ही कॅम्प, शिवाजीनगर आणि सॅनिटरी चाळ या भागात केले. त्यात तेथे गावठी दारू विकली जात असल्याचे दिसून आले,असे रमेशन यांनी 'सरकारनामा'ला आज सांगितले. देहूरोडमध्ये असे दहा, बारा गावठी दारूविक्रीचे अड्डे असल्याची माहिती त्यांनी दिली. देहूरोड पोलिस ठाण्याच्या सिनिअर पीआय वर्षाराणी पाटील- चव्हाण या महिला पोलिस अधिकारी असूनही त्यांच्या हद्दीत शाळकरी मुलगी अवैध धंद्यात असल्याचे पाहून धक्का बसला, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT