Someshwar Sugar Factory  sarkarnama
पुणे

Someshwar Election: अजितदादांनंतर सहकारातील पहिल्या मोठ्या निवडणुकीची घोषणा : सुनेत्रा पवारांसमोर शिवसेनेचे आव्हान

Someshwar Election will be held on October: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सुनेत्रा पवारांसमोर सत्ता कायम राखण्याचे आव्हान असून विजय शिवतारेंच्या स्वबळाच्या निर्णयामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Someshwar cooperative sugar factory election 2026: निवडणूक कार्यक्रमानुसार ७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. यानंतर अवघ्या काही दिवसांत प्रचाराची धामधूम रंगणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

राज्यात उच्चांकी दर देणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ ऑक्टोबर रोजी मतदानतर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर कारखान्यातील राष्ट्रवादीची सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. त्याचवेळी शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर भाजप नेते संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हंटले आहे.

२१ जागांसाठी निवडणूक

सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये उत्पादक सभासदांच्या १५ जागा आहेत. ‘ब’ वर्ग मतदारसंघातून एक जागा, अनुसूचित जाती-जमातीसाठी एक, इतर मागासवर्गासाठी एक, भटक्या-विमुक्त जाती-जमाती/विशेष मागास प्रवर्गासाठी एक, तर महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. कारखान्याचे कार्यक्षेत्र तब्बल १५० गावांमध्ये विस्तारलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा प्रभाव केवळ कारखान्यापुरता मर्यादित न राहता परिसरातील राजकीय समीकरणांवरही पडण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या अनुपस्थितीत पहिलीच निवडणूक

सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात १९९२ नंतर पहिल्यांदा अजित पवार यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक होणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने सलग सत्ता राखली होती. आता त्यांच्या अनुपस्थितीत कारखान्याच्या सत्तेची सुत्रे कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर येथे सभेत कारखान्याच्या संघटनेची स्थिती मजबूत असून आपणच ही निवडणूक जिंकणार असा विश्वासही व्यक्त केला आहे.

शिवतारेंच्या नेतृत्वात शिवसेना स्वबळावर..

शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. सोमेश्वर कारखाना हा केवळ सहकारी संस्थेपुरता मर्यादित नसून पुरंदर-हवेलीच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. शिवसेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवतारे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कारखान्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद किती प्रभावी ठरते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अर्जमाघारीच्या १५ दिवसांमुळे समीकरणे बदलणार?

निवडणूक कार्यक्रमात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात गटांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी, उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी आणि संभाव्य आघाड्या निश्चित करण्यासाठी राजकीय नेत्यांना मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कोण कोण रिंगणात राहते, कोण माघार घेते आणि कोणत्या गटांमध्ये समझोता होतो, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे. आता ७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील खऱ्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT