NCP panel selection Someshwar sugar factory election 2026 Sarkarnama
पुणे

Someshwar Sugar Election: सुनेत्रा पवारांची आज ‘परीक्षा’; सोमेश्वरसाठी 21 जागा, 514 दावेदार

NCP panel selection Someshwar sugar factory election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक असल्याची चर्चा असून, त्यामुळे मुलाखतींनंतर कोणाला संधी मिळणार आणि कोणाला थांबवले जाणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Sudesh Mitkar

Pune News: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची मोठी गर्दी झाल्यानंतर आता पॅनेल निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. अंतिम यादीत तब्बल ५१४ उमेदवार कायम राहिल्याने सर्वच राजकीय गटांसमोर इच्छुकांची संख्या कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षित जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे.

बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आज (२३ सप्टेंबर) दुपारी विविध प्रवर्गांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. महिला राखीव प्रतिनिधी, भटक्या-विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग, ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक व बिगर उत्पादक संस्था तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील इच्छुकांना पक्षाकडून बोलावण्यात आले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वसाधारण जागांसोबतच आरक्षित जागांसाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. विविध गटांमधून शेकडो इच्छुक मैदानात असल्याने प्रत्येक पक्षाला पॅनेल निश्चित करताना कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक असल्याची चर्चा असून, त्यामुळे मुलाखतींनंतर कोणाला संधी मिळणार आणि कोणाला थांबवले जाणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप आणि शिवसेना अशा प्रमुख गटांकडून स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेने यापूर्वीच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, शरद पवार गटानेही शंभरहून अधिक इच्छुकांशी संवाद साधला आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुलाखतींमुळे सत्ताधारी गटाच्या पॅनेल बांधणीला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारखान्याच्या २१ जागांसाठी उमेदवारांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळणे, नाराजांची समजूत काढणे आणि जातीय-सामाजिक समीकरणे जुळवत अंतिम पॅनेल उभे करणे, हे सर्वच गटांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत आता केवळ उमेदवारी नव्हे, तर इच्छुकांची मनधरणी आणि अंतर्गत राजकारणही निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

बुधवार, २३ सप्टेंबर २०२६

​दु. ०३.०० वा. : महिला राखीव प्रतिनिधी

​दु. ०४.०० वा. : भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी

​सायं. ०५.०० वा. : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील प्रतिनिधी

​सायं. ०५.३० वा. : 'ब' वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था

​सायं. ०६.०० वा. : अनु. जाती / जमाती प्रवर्गातील प्रतिनिधी

​स्थळ : राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा, बारामती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT