Pune News, 23 July : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे विधानसभेला मात्र 'एकला चलो'च्या भूमिकेत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मनसेने जिल्ह्यातील 21 विधानसभा मदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे.
तसेच पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा गेम प्लॅन सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) तयार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये मनसेने आपले उमेदवार दिले नव्हते. त्या उलट त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे (MNS) महायुतीसोबत युती करून लढेल असं मानलं जात असलं तरी मनसेने सध्या तरी आपली स्वतंत्र तयारी करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे मोठे पक्ष एकत्रित आले आहेत. या तिन्ही पक्षांचे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहेत.
तसेच रिपाईने देखील या निवडणुकीमध्ये दहा जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच होणार हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी मनसेने महायुतीबरोबर जाण्याचा विचार केला, तरी त्यांच्या वाटेला किती जागा येणार? हा प्रश्नच आहे. त्यामुळेच मनसेने सध्या तरी स्वतंत्र अशी विधानसभेची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
मनसेकडून राज्यातील 200 पेक्षा अधिक जागांचे सर्व्हे केले जाणार आहेत. त्यामध्ये पुणे (Pune) शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने कसबा हडपसर कोथरूड शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 5 विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढली होती. मात्र त्यावेळी मनसेला अपेक्षित यश आलं नाही.
दरम्यान, आज मंगळवारी (23 जुलै) पुणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी 'शिवतीर्थ' या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे शहरातील आठही मतदारसंघाचा अहवाल राज ठाकरेंना देण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला.
तसेच सर्व विधानसभा मतदारसंघात कामाला लागा अशा सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर, किशोर शिंदे, बाबू वागस्कर यांचा समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.