Dhananjay Munde
Dhananjay Munde  Sarkarnama
पुणे

बारामतीला तीन हजार गेले की दीड हजार इंदापूरला येतात : मुंडेंनी उलगडले भरणेंच्या निधीचे गुपित

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माझा जीव तर दत्तामामा भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर आहेच. पण, सगळेच त्यांच्यावर प्रेम करतात. फक्त प्रेमच करत नाही, तर मजबूत निधीही देतात. त्याचा मला शोध घ्यावा लागेल. सध्या कॅबिनेट मंत्र्यापेक्षा राज्यमंत्र्याच्या मतदारसंघात जास्त निधी मिळतो, हा जरा संशोधनचा भाग आहे. मला जरा त्यावर संशोधन करावे लागेल. इंदापूर मतदारसंघ हा बारामतीला लागून आहे. बारामतीला तीन हजार गेले की दीड हजार रुपये हळूच इकडे इंदापूरला येतात, अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निधी मिळविण्याच्या चिकाटीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कौतुक केले. (Statement of Dhananjay Munde regarding the funds received by Indapur)

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे कामगार आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. या वेळी व्यासापीठावर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले की, इंदापूर हा बारामतीच्या जवळ असल्याने दत्तात्रेय भरणे यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. आमचं (बीड-बारामती) अंतर जरा जास्त आहे. आम्ही ५०० किलोमीटर जरी असलो तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्हालाही विकासाच्या कामांसाठी निधी कमी पडू देत नाहीत. कमी पडतंय, असं वाटू लागलं की आज दत्तात्रेय भरणेमामाही मंत्री आहेत. बांधकाम आणि जलसंधारणसारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. मलाही न कळवता माझ्या परस्पर ते माझ्या परळी मतदारसंघात निधी देतात. फक्त आकडा मी सांगणार नाही. मी जर हा आकडा सांगितला, तर उद्यापासूनच मामांची परेशानी व्हायची. पण एक निश्चित आहे की मामाचं आणि माझं नातं हे परमेश्वर बनवल्यासारखं आहे.

इंडस्ट्रीजमुळे वालचंदनगरचे नाव जगात घेतले जायचे. माझ्या २४ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कामगार आणि शेतकऱ्यांचा एकत्रित मेळावा झालेला नाही. पण, आम्ही कामगार आहोत आणि काम नसल्यामुळे शेतकरी झालो. नाही तर येथील प्रत्येक जण शेतकरी आहेत आणि ते कामगार झाले असावेत; म्हणून हा एकत्रित मेळावा घेतला असावा. पुण्यात मी शिक्षणाला असताना वालचंदनगरचा विषय काढला, तर आम्ही सर्वजण काम सोडून ते ऐकत बसायचो, असेही मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्यायमंत्री मुंडे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे या भागातील उद्योग डबघाईला येऊ देणार नाहीत. त्यांच्यासोबतच येथील उद्योग वाचविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. वालचंदनगरचे गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी मी दत्तात्रेय भरणे यांच्यासोबत झिजवायला तयार आहे. भरणेमामांनी मला फोन केला आणि वालचंदनगरच्या कार्यक्रमाला यावे लागतेय, असे सांगितले. मीही लगेच येण्याचे कबूल केले. मामांनी माझ्याकडे एखादा शब्द टाकला आहे आणि तो मी खाली पडू दिला आहे, असे कधीच झाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT