Sunetra Pawar Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar: दादांनी दिलेले टार्गेट पुणे जिल्हा परिषदेने गाठले! राज्यात दुसरा क्रमांक; सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Sunetra Pawar shared an old video recalling Ajit Pawar’s target for the district: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. दिवंगत अजित पवारांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या लक्ष्याचा व्हिडिओ सुनेत्रा पवारांनी शेअर केला.

Sudesh Mitkar

Pune Zilla Parishad News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी पुणे जिल्हा परिषदेला दिलेले टार्गेट जिल्हा परिषदेने गाठले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, ४ सप्टेंबर २०२५ रोजी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचे लक्ष्य दिले होते.

त्यानंतर वर्षभरात जिल्हा परिषदेने केलेल्या कामाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा संबंधित कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘सांगलीच्या पुढे जाऊन राज्यात पहिला नंबर आणा’

४ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सीईओ गजानन पाटील यांना थेट लक्ष्य दिले होते. "तुमचं मूळ गाव चांगलं असलं, तरी तुम्ही आता पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आहात. त्यामुळे सांगलीच्या पुढे जाऊन राज्यातून आपला पहिला नंबर यायला हवा," अशा शब्दांत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती.

हे लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने आणि मेहनतीने काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. सकाळपासून कामाला लागलात, तर यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक तर सांगली जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविल्याने अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे.

सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

पुणे जिल्हा परिषदेच्या या कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यासोबत त्यांनी, आदरणीय दादांनी पाहिलेलं स्वप्न आणि व्यक्त केलेला विश्वास, आज पुणे जिल्ह्याच्या अभिमानास्पद कामगिरीतून सार्थ ठरला अशी भावना व्यक्त केली.

अजित पवार यांनी दिलेले लक्ष्य, त्यानंतर जिल्हा परिषदेने केलेले काम आणि आता मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार यांची सांगड या पोस्टमधून घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या यशाला अजित पवार यांच्या आठवणींची भावनिक किनार लाभली आहे.

२७६ ग्रामपंचायतींचा सहभाग; २४५ कोटींची करवसुली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मूलभूत सुविधांचा विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, महिला आर्थिक सक्षमीकरण आणि लोकसहभागातून गावांचा विकास या बाबींवर भर देण्यात आला.

अभियानाच्या कालावधीत सहभागी ग्रामपंचायतींनी घरपट्टी आणि पाणीपट्टीतून सुमारे २४५ कोटी रुपयांची करवसुली केली. नागरिकांच्या सहभागातून सात कोटी ९७ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. याशिवाय, जिल्ह्यातील ७३४ जलस्रोतांचे बळकटीकरण, पाच हजार २२४ सौरपंप कार्यान्वित करणे आणि सात लाख १२ हजार ५८७ वृक्षांची लागवड असे उपक्रम राबविण्यात आले.

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही भर देण्यात आला. जिल्ह्यातील ६५१ प्राथमिक शाळा, ८४६ अंगणवाडी केंद्रे आणि १५४ पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये निर्धारित मानकांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

आडाचीवाडी ग्रामपंचायतीला पाच कोटींचे बक्षीस

या अभियानात पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले. तर पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. नाशिक येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यात आला.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सभापती अमोल नलावडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानात नाशिक जिल्हा परिषदेने प्रथम, तर सांगली जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक मिळविला.

अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी पुणे जिल्हा परिषदेला राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचे लक्ष्य दिले होते. यंदा जिल्हा परिषदेने दुसरा क्रमांक मिळविला असला, तरी ग्रामपंचायतींच्या सहभागातून झालेली कामगिरी आणि राज्यस्तरावर मिळालेली दखल यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याची आणि अपेक्षांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT