Sunetra Pawar Campaign Sarkarnama
पुणे

Baramati Lok Sabha Constituency : बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू; लोकसभेला उमेदवारी मिळणार?

Sunetra Pawar and Supriya Sule : कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ बारामतीमध्ये फिरतोय

Chaitanya Machale

NCP Political News : राष्ट्रवादीमध्ये बंड होऊन अजित पवार यांनी भाजपबरोबर कारभार बघणे सुरू केल्याने भाजपचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला बारामती लोकसभेचा गड काबीज करण्याची भाजपने राजनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या मदतीने या मतदारसंघाला सुरुंग लावत तेथे भाजप महायुतीचा झेंडा फडकविण्याचा निश्चय करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे. बारामती परिसरात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची मोठी शक्यता आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ आता फिरू लागला आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून सुनेत्रा पवारही चांगल्याच ॲक्टिव्ह झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप, शिवसेना शिंदे गट यांच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकसभेची जागा आम्ही लढविणार आणि जिंकणारच, असा दावा करत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर आव्हानच दिले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघात नक्की कोण उमेदवार असेल, याबाबत सर्वांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत दौंड विधानसभेचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघात येत असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भागात भावी खासदार म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे-पाटील यांचे बॅनर लागले होते.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याच नावाची सर्वात जास्त चर्चा आहे. त्यांनी नुकतीच कांचन कुल यांच्या घरी जाऊन त्यांची भेटही घेतलेली आहे. तसेच विविध कार्यक्रमांनाही त्या हजेरी लावताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही लागलेले आहेत. आता त्यांनी केलेल्या कामाचा प्रचार रथच बारामती लोकसभा मतदारसंघातून फिरताना दिसू लागले आहेत. त्यामुळे लोकसभेत आता नणंद-भावजय असा सामना रंगण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT