Baramati Political News : महाभारतात श्रीकृष्णाच्या विरोधात सर्व भावकी होती, पण शेवटी जिंकला तो कृष्णच, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबातील इतर सदस्यांवर निशाणा साधला आहे. सुनेत्रा पवार यांचे हे सूचक विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. आता याला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) नावाची घोषणा झालेली आहे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या नावाच्या घोषणेची आैपचारिकताच बाकी आहे. दोन्ही पक्षांनी बारामतीत प्रचाराची राळ उठवली आहे. भोरमधील सारोळा येथील एका सभेत बोलताना सुनेत्रा पवारांनी केलेले विधान लक्षवेधी ठरत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) हे कुटुंबात एकटे पडल्याचे दिसून येत आहेत. याबाबत त्यांनी बारामतीत कुटुंबातील सर्वजण विरोधात असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनीही सडकून टीका केली, तर त्यांचे चिरंजीव युगेंद्र यांनी शरद पवारांची साथ दिली आहे. आमदार रोहित पवार यांनीही काका अजित पवार यांच्या पक्षविरोधात मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचे विधान चर्चेचे ठरत आहे.
भोर तालुक्यात प्रचार करताना सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सारोळ्यात सभा घेतली. या वेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामांचा आढावा घेतला. पक्षीय राजकारणापलीकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. संकटात धावणाऱ्या अजितदादांचे आपण सारे भाऊ आहोत, असे सांगून त्यांनी महाभारताचा दाखला दिला.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, पण जिंकला तो कृष्णच. त्यांचे हे विधान अजित पवारांविरोधात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना टोला असल्याचे बोलले जात आहे. या विधानातून त्यांनी लोकसभेत अजित पवारांच्या विचारांचाच उमेदवार खासदार होणार असल्याचेही सूचित केले आहे. याला विरोधी गटाकडून काय उत्तर मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.