Sunil Tingre, Supriya sule, Sharad Pawar  Sarakrnama
पुणे

Supriya Sule : टिंगरेंची नोटीस शरद पवारांनाच; सुळेंनी पत्रकार परिषदेत पुरावाच दिला

Political News : आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा पुरावाच भरपत्रकार परिषदेत दिला आहे. यामुळे आगामी काळात नोटिशीचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शेकार अपघात प्रकरणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरेंनी आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस पाठवली असून शरद पवारांना नोटीस पाठवली नसल्याचा म्हटलं होतं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा पुरावाच भरपत्रकार परिषदेत दिला आहे. यामुळे आगामी काळात नोटिशीचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोमवारी(ता.11) पिंपरी चिंचवड येथे मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी सुनील टिंगरेंच्या नोटिशीच्या मुद्द्यासह अनेक विषयांवर रोखठोक भाष्य केलं. त्या म्हणाल्या, पोर्शप्रकरणात आमची बदनामी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शरद पवारांनी माफी मागावी असं नोटिशीत म्हटलं आहे. पण पोर्शे कारचा अपघात झाला हे पोलिसांनी मान्य केले आहे. त्यासोबतच सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणावरून आम्ही आता माफी मागावी? जर आम्ही त्यांच्यावर टीका केली, तर ते आमच्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल कारवाई करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी नोटीशीतून दिल्याचंही सुळेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शरद पवार यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी नोटीस बजावली असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी एका सभेत केला होता. परंतु, हा दावा सुनील टिंगरे यांनी फेटाळून लावत, अशी नोटीस पाठवली असेल तर ती जाहीर करावी, असे आव्हानही सुप्रिया सुळेंना दिले होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी ती टिंगरेंनी नोटीसच माध्यमांसमोर सोमवारी वाचून दाखवली.

या नोटिशीनुसार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ही नोटीस पाठवली नसून शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसलाही पाठवण्यात आली होती. ही नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना बजावण्यात आली असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेत दिली.

या अपघात प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्यातील आरोपीना मदत करणाऱ्याच्या विरोधात मी बोलले हा गुन्हा असेल, तर माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, हा गुन्हा मला मान्य आहे. त्यामुळे माझ्या व शरद पवार यांच्याविरोधात सिव्हील आणि क्रिमिनल केस जरूर करावी. कारण की, आम्ही सत्य बोलतो, असे यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

चाकणकरांनी दिले स्पष्टीकरण

दरम्यान, सुळे यांनी नोटीस दाखवल्यानंतर आता रुपाली चाकणकरांनी ती नोटीस नेमकी कुणाला पाठवली आहे. याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांनी कुठलीही नोटीस पाठवलेली नाही, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवली आहे, असे चाकणकरांनी ती नोटीस दाखवत सुप्रिया सुळे यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. याबाबत त्यांनी एक्सवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT