sunil kedar
sunil kedar Sarkarnama
पुणे

बैलगाडा शर्यतप्रेमींना महिनाभरात खूशखबर!

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : बैलगाडा शर्यतप्रेमींना येत्या महिना ते दीड महिन्यात खूशखबर देण्यात येईल. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात शर्यती सुरु करण्याबाबत सकारात्मक निकाल मिळविण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्या लढाईला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. (Supreme Court to rule in favor of bullock cart race : Sunil Kedar)

बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतची सुनावणी सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) होणार होती. त्याची तयारी करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री केदार हे आज (ता. १४ नोव्हेंबर) अधिकारी, वकिलांसह दिल्लीत दाखल झाले होते. पण, तांत्रिक कारणामुळे सोमवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबाबत माहिती देताना केदार यांनी वरील माहिती दिली.

ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून बैलगाडा शर्यतींचा विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या विषयाला चालना दिली गेली. येत्या सोमवारी (ता. १५) या विषयाची सुनावणी होणार होती. पण, तांत्रिक अडचणींमुळे सुनावणी पुढे ढकलली आहे. पण, दोन दिवसांत सुनावणी होईल, असा मला विश्वास आहे. या महिन्या दीड महिन्यामध्ये निकाल लागेल. कारण, हा विषय ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. बैलाची खिलार जात जगवायची आहे, त्यासाठी आधार दिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सकारात्म निकाली मिळवेल, असा विश्वासही मंत्री केदार यांनी बोलून दाखवला.

यासंदर्भात सरकारी वकिल ॲड. सचिन पाटील म्हणाले की, बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दिलेला आहे. सुनावणीची तयारी चालू आहे. त्याकरिता पशुसवर्धन मंत्री सुनील केदार हे दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्र सोडून कर्नाटक, तामिळनाडू व आसपासच्या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती सुरु आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रात शर्यती बंद आहेत. त्या ताबडतोब सुरु करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सुनावणी होणार आहे.’’

“बैलगाडा मालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. गेली अनेक वर्ष निर्णयाकडे बैलगाडाप्रेमी डोळे लावून बसलेले आहेत,’’ अशी प्रतिक्रिया आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दचे बैलगाडा मालक बाळासाहेब आरुडे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT