Supriya Sule-Pratibha Pawar  Sarkarnama
पुणे

Pratibhatai Pawar News : प्रतिभा पवारांनी ४४ वर्षांत प्रथमच घेतले वळसे पाटलांशिवाय भीमाशंकरचे दर्शन...

Bhimashankar Darshan : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सामील झाले आहेत.

विजय दुधाळे

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी ४४ वर्षांत प्रथमच वळसे पाटील कुटुंबाशिवाय बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथील शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे पवार आणि वळसे पाटील कुटुंबीयांमध्ये दरी निर्माण झाल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. (Supriya Sule, Pratibha Pawar took Darshan Bhimashankar)

प्रतिभाताई पवार यांच्यासोबत (स्व.) गोविंदराव आदिक यांच्या पत्नी पुष्पलताताई आदिक, सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे, तसेच वळसे पाटील कुटुंबीयांतील दिलीप वळसे पाटील किंवा त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील ह्या कामय त्यांच्यासोबत भीमाशंकरला असायचे. यंदा मात्र प्रथमच वळसे पाटील कुटुंबीय सोबतीला न घेता प्रतिभाताई पवार यांनी भीमाशंकरचे दर्शन घेतले आहे.

भीमाशंकरला आल्यानंतर वळसे पाटील कुटुंबीयांकडे जेवणाचा बेत असायचा. तसेच, पूजा, अभिषेक याची व्यवस्थाही स्थानिक आमदार असल्यामुळे वळसे पाटील कुटुंबीय करायचे. पवारांचे भीमांशकर दर्शन हे वळसे पाटील यांना घेऊनच व्हायचे. वळसे पाटील जेव्हा नसायचे, त्यावेळी त्यांच्या पत्नी किरणताई या प्रतिभा पवार यांच्यासोबत भीमाशंकरला जात असत. यंदा मात्र पवार कुटुंबीयांसोबत वळसे पाटील प्रथमच नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. तो पवारांसाठी धक्का होता. कारण दिलीप वळसे पाटील यांना शरद पवारांचे मानसपुत्र मानले जाते. त्यामुळे बंडात जेव्हा वळसे पाटील यांचे नाव दिसले, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. कारण वळसे पाटील हे शरद पवारांची साथ सोडतील, असे अनेकांना स्वप्नातही वाटत नव्हते, ती गोष्ट घडली होती.

दरम्यान, शरद पवारांनीही वळसे पाटील यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘पुणे जिल्ह्यात पदांबाबत आंबेगावला झुकते माफ देऊनही...’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे यंदाचा श्रावण वळसे पाटील यांच्या लक्षात कायम राहण्यासारखा असणार आहे.

प्रतिभा पवार भीमाशंकर वारी का करतात?

शरद पवार यांनी भीमाशंकर येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी यावे, असा आग्रह आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील (सहकार मंत्री दिलीप वळसे पाटीच यांचे वडील) यांचा होता. त्यानुसार पवार दर्शनासाठी गेले होते. तेव्हा ते उद्योग मंत्री होते. भीमाशंकर अभयारण्यातील टेकवडीवरील वन विभागाच्या विश्रामगृहात पवार यांचा मुक्काम होता. त्या वेळी त्या ठिकाणी विजेची सोय नव्हती, प्रकाशासाठी कंदील व दिवे होते.

एका खोलीत त्यांची राहण्याची सोय होती. शरद पवारांना रात्री एकच्या सुमारास थोडीशी हालचाल जाणवली; म्हणून ते उठून बसले, तर त्यांच्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला. त्यांनी दत्तात्रेय वळसे पाटील यांना हाक मारली. तेही लगेच धावत आले. पवारांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.

त्या वेळी दत्तात्रेय वळसे पाटील आनंदी होत म्हणाले, साहेब, हा तर शुभशकुन आहे. आपण पहाटे भीमांशकरची पूजा करूयात! त्यानुसार पवार यांनी पूजा केली. त्यानंतर शरद पवार मुंबईला परतले. या घटनेनंतर आठ ते दहा दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री झाले. हा किस्सा खुद्द पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितला. ही गोष्ट जेव्हा प्रतिभाताई पवार यांना समजली, तेव्हापासून गेली ४४ वर्षे त्या श्रावण महिन्यात भीमाशंकरला शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT