Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : तुतारीचा निनाद तेव्हाही होता; शरद पवारांवरील पहिल्या गुन्ह्याची सुप्रिया सुळेंना आठवण, म्हणाल्या...

Sudesh Mitkar

Pune News : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यानंतर नुकतेच शरद पवार यांनी रायगड येथे जाऊन या नवीन चिन्हाचे अनावरण केलं. राज्यभर या तुतारीचा निदान करणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यावर दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्याचा दाखला देत त्यांनी एक त्या वेळेचा फोटो प्रसिद्ध केला आहे. त्या फोटोमध्ये एक तुतारीवादक दिसत आहे. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी "तुतारीचा निनाद तेव्हाही होता; तेव्हाही फुंकले होते संघर्षाचे रणशिंग" आता ही... अशी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आदरणीय पवारसाहेबांनी जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणातून 7 डिसेंबर 1980 रोजी जळगाव ते नागपूर अशी पायी शेतकरी दिंडी काढली. जवळपास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा हा पल्ला शेतकरी बांधवांनी साहेबांच्या सोबतीने पायी पार केला. पुढे नागपूर येईपर्यंत या दिंडीचे रूपांतर प्रचंड अशा जनसमुदायात झाले.

देशपातळीवरील नेते या दिंडीत सहभागी झाले. यामध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण, कर्पुरी ठाकूर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, राजेश्वर राव, चंद्रजित यादव, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे आदी सहभागी झाले होते.

तसेच कला क्षेत्रातील संवेदनशील कलाकारांनीदेखील या दिंडीला पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. यामध्ये डॉ. श्रीराम लागू, गोदाताई परुळेकर, ना. धों. महानोर आदी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या दिंडीमुळेच पवारसाहेबांवर पहिला गुन्हा दाखल झाला. अमरावतीहून दिंडीत सहभागी झालेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांसह त्यांना पोहरा येथे अटक करून भंडाऱ्यातील डाक बंगल्यावर नेण्यात आले, परंतु त्यांची लवकरच सुटका झाली आणि ते सर्वजण पुन्हा शेतकरी दिंडीत सहभागी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही दिंडी म्हणजे एक प्रखर असे जनआंदोलन होते. या आंदोलनाच्या रेट्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेसाहेबांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला, असे सांगत तुतारीच्या निनाद तेव्हाही होता; तेव्हाही फुंकले होते संघर्षाचे रणशिंग आताही फुकले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT