Pune News: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं. यानंतर आठवडाभर चाललेल्या खलबतानंतर 5 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधीनंतर सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. मात्र अद्याप त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
त्यामुळे मंत्रिपदासाठी वेटिंगवर असलेल्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी पाण्यात देव ठेवले आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते विविध माध्यमातून आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. यंदा मोठ-मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डिच्चू मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे देखील नाव घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आज पुण्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्यात फोटोला दुग्धाभिषेक केल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला असला तरी अद्याप महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिमंडळाच्या वाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे. कोणाला किती मंत्रिपद मिळणार? आणि कोणतं मंत्रिपद कोणाकडे राहणार यावरती या तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत होत नसल्याचा सांगितलं जात आहे.त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचं बोललं जात आहे.
या निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) भरघोस असे यश मिळाल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाजपचाच वरचष्मा असेल असं जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कमी मंत्रिपद मिळू शकतात. त्यामुळे मागच्या मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांना यंदा नारळ मिळण्याची शक्यता आहे.
जुन्याना थांबून नव्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामुळे जुन्या मंत्रिमंडळातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे हे सर्व नेते मुंबईत राहून मंत्रिपदाची फिल्डिंग लावून असल्याचं बोललं जात आहे.
इकडे मंत्रिपदासाठी नेते लॉबिंग करत असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये देखील आपल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणार का नाही, याबाबत अस्वस्थता आहे. त्यामुळे आज तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात येत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि तानाजी सावंत यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.