Rohit Pawar Sarkarnama
पुणे

TDR Scam News : दोषींवर कारवाई न झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील 'TDR' घोटाळा पुन्हा विधिमंडळात गाजणार!

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri Chinchwad News : उद्योगनगरीतील वाकड येथे दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप राज्य विधीमंडळाच्या नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यानंतर या टीडीआर वाटपाला स्थगिती देण्यात आली.

मात्र, तो आदेश देणारे आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह, महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने हा प्रश्न आता विरोधी बाकावरीलच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे विधीमंडळाच्या मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा मांडणार आहेत.

टी़डीआर घोटाळा विधानसभेत मांडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सरकारला करण्यास भाग पाडू, असे आश्वासन रोहित पवार(Rohit Pawar) यांनी त्यासाठी पिंपरीत महापालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बुधवारी (ता.21) दिले. युवा संघर्ष यात्रेनंतर ते शहरात आले होते.

यावेळी त्य़ांनी गेल्या 16 दिवसांपासून हे आंदोलन करणाऱ्या ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावसाहेब गंगाधरे, अनिल गाडे, संतोष शिंदे, वसंत पाटील यांची भेट घेतली. वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकासकाला विकसित करण्यासाठी देताना हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे.

जर हा घोटाळा झाला नाही, तर टीडीआर वाटपाला स्थगिती का दिली? अशी शंकावजा विचारणा रोहित पवारांनी यावेळी केली. यात मनपा आयुक्त गांधारीची भूमिका पार पाडत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता गैरकारभाराला प्रोत्साहन तसेच संरक्षण देत आहेत. त्यामुळे हा प्रश्न विधानसभेत मांडू, असे ते म्हणाले.

टीडीआर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेड(Sambhaji Brigade) दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. त्याकरिता त्यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), पोलीस महासंचालक,पुणे अँटी करप्शन ब्युरो तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे तक्रारी केल्या. तसेच हा घोटाळा दिसावा म्हणून आयुक्तांना त्यांनी भिंगाचा चष्मा भेट दिला. इतरही संस्था,संघटना आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवूनही या घोटाळ्यातील दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT