Tehsildars and other revenue officials face action over alleged irregularities in land ownership mutation records. Sarkarnama
पुणे

Land Records Scam : तहसीलदार, प्रांतधिकाऱ्यांना '155'चा खेळ नडला; सातबाऱ्यात फेरफार, ४० अधिकाऱ्यांची थेट विभागाबाहेर उचलबांगडी!

Tehsildars 40 Revenue Officials : अधिकारांचा गैरवापर करून जमीन मालकी हक्कात फेरफार करणाऱ्या तहसीलदारांसह महसूल विभागातील तब्बल 40 अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई होणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील 'कलम १५५'चा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कात फेरफार करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे महसूल विभागातील तब्बल ४० अधिकाऱ्यांची थेट विभागाबाहेर बदली करण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने जाहीर केला आहे. यापुढे या दोषी अधिकाऱ्यांना पुन्हा महसूल विभागात नियुक्ती दिली जाणार नाही, असा सज्जड इशाराही दिला आहे.

हस्तलिखित उताऱ्यातील दुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिनियमातील कलम १५५ चा वापर केला जातो. मात्र, या तरतुदीचा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कात फेरफार केल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी सुरू केली आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांच्या मागील पाच वर्षांतील आदेशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातून गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आलेल्या अधिकाऱ्यांवर बदल्यांची कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महसूल विभागातील मंडल अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी अशा सुमारे ४० अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागाबाहेर बदल्या केल्या जाणार असून, त्यांना पुन्हा महसूल विभागात आणले जाणार नाही. त्यामुळे महसूल प्रशासनातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यात पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती असे एकूण सहा महसूल विभाग आहेत. महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती ज्या विभागात झाली आहे, त्याच विभागात त्यांना पुन्हा नियुक्ती मिळणार नाही, असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या महसूल विभागाबाहेर अन्य विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना तिथेच कायम ठेवण्यात येणार आहे.

कलम १५५ नेमके कशासाठी?

महसूल संहितेतील कलम १५५ चा वापर प्रामुख्याने अभिलेखातील किंवा हस्तलिखित नोंदीतील चुका दुरुस्त करण्यासाठी अपेक्षित आहे. मात्र, या तरतुदीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या मालकी हक्कात फेरफार करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये एका व्यक्तीच्या मालकीची जमीन दुसऱ्याच्या नावावर करण्याचे गंभीर प्रकार घडल्याची माहिती महसूल विभागाच्या तपासणीत पुढे आली आहे.

काही प्रकरणांमध्ये तर पूर्वी नष्ट केलेल्या नोंदी पुन्हा तयार करून किंवा चुकीच्या पद्धतीने फेरफार करून जमीन हस्तांतरणाचा प्रयत्न झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे कलम १५५ च्या वापरावर अधिक कडक नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर केवळ विभागाबाहेर बदलीची कारवाई होणार की गैरप्रकाराच्या स्वरूपानुसार पुढील शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT