Sushil Khodwekar IAS
Sushil Khodwekar IAS Sarkarnama
पुणे

TET Exam Scam : कोरोनामुळे IAS खोडवेकरचा जामीन अर्ज... न्यायालय म्हणाले...

सनील गाडेकर

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (TET Exam Scam) प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी अटकेत असलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांचा अंतरिम जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी हा आदेश दिला.

खोडवेकर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला. याबाबत दोनही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने खोडवेकर यांचा अर्ज फेटाळला आहे. खोडवेकर यांनी वकिल एस. के. जैन व अमोल डांगे यांच्यामार्फत अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. खोडवेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. त्यामुळे खोडवेकर यांना अंतरिम जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

या जामीन अर्जास सायबर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला. आरोपी प्रभावशाली पदावर काम करत असून, त्याच्या चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपलेला नाही. राज्य सरकार त्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरोपीला जामीनावर मुक्त करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद जाधव यांनी केला.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने तपशीलवार चौकशी झालेली नाही. आरोपी आपल्या पदाचा गैरवापर करून तपास व साथीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी मांडले.

खोडवेकर यांना योग्य उपचार सुविधा मिळत आहेत. अर्जदार आरोपी आयएएस अधिकारी असून प्रभावशाली पदावर कार्यरत आहे. अंतरिम जामीन मंजूर झाल्यास ते तपासात अडथळे आणण्याची आणि पुराव्यात छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीचा जामीन फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT