Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Thackeray Vs Shinde : नेहमी एकमेकांवर तुटुन पडणारे ठाकरे अन् शिंदे गट पुण्यात आले एकत्र; काय आहे कारण ?

Shivsena political News : एकमेकांच्या विरोधात असलेले हे दोघे समोरासमोर आल्याने काही तरी राडा होईल, असे वाटत असतानाच....

Sudesh Mitkar

चैतन्य मचाले

Pune News : शिवसेनेतील फाटाफुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये वारंवार संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. नुकतेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंधेला दोन्ही गटात जोरदार राडा झाला. दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गट आमने सामने आले होते. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान या दोन्ही गटातील नेते रविवारी सायंकाळी समोरासमोर ठाकले होते.

रविवारी असलेल्या सुट्टीच्या दिवशी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका ठिकाणी हे दोन्ही गट सकाळी समोरासमोर आले. एकमेकांच्या विरोधात असलेले हे दोघे समोरासमोर आल्याने काही तरी राडा होईल, असे वाटत असतानाच परस्परांबद्दल कोणताही वाईट शब्द न काढता हसत एकमेकांचे स्वागत करत, गळाभेट घेत एकमेकांच्या विरोधात आवाज वाढविणारे हे पदाधिकारी गप्पा आणि हास्य विनोदात रंगून गेले. निमित्त होते ते माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे ! कसबा विधानसभा मतदारसंघातील रास्ता पेठेमधील राजा धनराज गिरजी महाविद्यालय येथे या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहरात शिवसेनेची एक वेगळी ओळख आहे. महापालिकेत शिवसेनेचे फारसे सभासद निवडून आलेले नसले तरी पालिकेच्या तसेच शहरात सेनेचा दबदबा होता. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत बंड केल्यानंतर पुणे शहरातील शिवसेनेची राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या गटात तर काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची कास धरली. शिवसेनेतील फुटीनंतर मागील एक ते दीड वर्षाच्या काळात एकमेकांचे मित्र म्हणून काम करणारे हे पदाधिकारी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.

मात्र रविवारचा दिवस याला अपवाद होता. ठाकरे गटाचे विशाल धनवडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाल शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि जिल्हा प्रमुख रमेश कोंडे हे समोरासमोर आले. मात्र यावेळी त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन, चेष्ठा मस्करी करत दिवाळी फराळाचा आनंद घेतला. या दिवाळी फराळ कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया यासह अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रविंद्र धंगेकर, माजी महापौर, माजी आमदार यांच्यासह पालिकेतील माजी नगरसेवकांचा समावेश होता.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT