Punit Balan News Sarkarnama
पुणे

Punit Balan News : 3.20 कोटी मागणारे प्रशासन झुकले; बड्या नेत्याच्या मध्यस्थीने पुनीत बालन तरले

सरकारनामा ब्यूरो

Pune News : दहीहंडीमध्ये जागोजागी बेकायदा फ्लेक्सबाजी करून उत्सवांत मिरवणाऱ्यांना महापालिकेने धडा शिकविण्याचा पवित्रा घेतला होता. महापालिकेच्या यंत्रणेला न जुमानता बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारल्याचा ठपका ठेवून उद्योजक पुनीत बालन यांना महापालिकेने तब्बल 3.20 कोटी रुपयांचा दंड केला आहे. गंभीर म्हणजे पुढच्या दोन दिवसांत रक्कम भरण्याचा आदेश महापालिकेने बालन यांना दिला होता. मात्र, पुण्यातील एका बड्या नेत्याच्या मध्यस्थीने बालन यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. हा बडा नेता कोण, याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दहीहंडीमध्ये मंडळांच्या परिसरात जाहिरात लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने बालन यांना 3 कोटी 20 लाख रुपये दंडाची नोटीस पाठवल्याच्या निषेधार्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढत पालिकेचा निषेध केला. या नोटिसीला स्थगिती देण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत शुल्क भरण्यास स्थगिती दिली आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी बालन यांना दहीहंडीच्या दुसर्‍या दिवसापासून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापर्यंत शहरात अडीच हजार जाहिरात बॅनर लावल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. यावरून दहीहंडी व गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गुरुवारी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. नितीन पंडित, ऋषिकेश बालगुडे, शिरीष मोहिते, कुमार रेणुसे, संदीप काळे, भाऊ करपे, मयूर उत्तेकर, पुष्कर तुळजापूरकर, राजेंद्र काकडे, पृथ्वीराज निंबाळकर, प्रसाद पटवर्धन, दत्ता सागरे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी ढाकणे यांनी संबंधित विभागाचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी शिष्टमंडळाचे बोलणे करून दिले.

खेमनार यांनी बालन यांना दंडाची नोटीस पाठवली नाही असे स्पष्ट केले. राज्य सरकारने गणेश मंडळांना उत्सव काळात जाहिरात शुल्क माफ केले आहे. दहीहंडी आणि गणेश उत्सव दरम्यानच्या काळात लावण्यात आलेल्या जाहिरातींचे शुल्क आकारले आहे. तो दंड नसून जाहिरात शुल्क आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत ती रक्कम भरण्यास स्थगिती देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी बालन यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये दंड असा उल्लेख केला असून, तो दोन दिवसांत भरण्यास सांगितले. न भरल्यास मिळकतीवर बोजा चढवण्याचा इशारा दिला. जाहिरात शुल्क आकारले असेल, तर माध्यमांपर्यंत ती नोटीस पाठविण्या मागील अधिकार्‍यांचा हेतू संशयास्पद आहे. शुल्क आकारणी ही रुटीन बाब असताना जाणीवपूर्वक बालन यांची बदनामी करण्यात आली आहे. बालन हे जाहिरातदार आहेत व मंडळांनी त्यांच्या परिसरात त्या लावल्या आहेत. त्यामुळे या नोटीस मंडळांना देणे गरजेचे होते. शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पालिका त्या होर्डिंगवर जाहिरात असलेल्या कंपन्यांना दोषी धरत नाही.

तर होंर्डिंग मालकांवर कारवाई होते, मग या घटनेत जाहिरात कंपनीला नोटीस देण्याचा जगताप यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कोरोनानंतर मंडळांना वर्गणी मिळण्यात अडचणी येत असताना बालन यांनी मोठा आर्थिक हातभार लावला. पुण्याचा पारंपरिक गणेश उत्सव साजरा करण्यास मंडळांना बळ मिळाले. शासनाच्या मंडळांसाठीचे जाहिरात शुल्क माफ करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करून महापालिका अधिकारी मनमानी काम करत आहेत. त्यामुळे बालन यांना दिलेली नोटीस मागे घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारू, असा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT