Sharad Pawar News Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : ''शेतकऱ्यांच्या वेदनांचा आवाज दिल्लीपर्यंत...'' ; शरद पवारांचं पुण्यात विधान!

Farmers problem : ''जगावं कसं हा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर आहे'' असंही पवारांनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. शनिवारी पुण्यात याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकरी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शरद पवारांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले , '' महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांच्या वेदनांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहचावा, या हेतूने हा आक्रोश मोर्चा 27 ते 30 डिसेंबरपर्यंत अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला. शेतकरी अस्वस्थ आहेत. काल मी अमरावतीला होतो. तिथे स्थानिक वृत्तपत्रात पहिली बातमी वाचायला मिळाली, की दहा दिवसांमध्ये यवतमाळ, अमरावती, वर्धा या ठिकाणी 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा बळीराजा देशाची भूक भागवणारा, काळ्या आईशी इमान राखणारा आत्महत्या करतोय.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय ''मला आठवतंय माझ्याकडे जेव्हा कृषी विभागाची जबाबदारी आली, तेव्हा पहिल्या आठवड्यात मला नागपूर आणि यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तेव्हा मनमोहन सिंग(Manmohan Singh) हे पंतप्रधान होते, त्यांना मी सांगितलं की, शेतकरी आत्महत्या करतोय ही लहान गोष्ट नाही. आपण दोघांनी गेलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, की टोकाची भूमिका शेतकरी का घेतो आहे?'' असं यावेळी पवारांनी सांगितलं.

याचबरोबर ''पंतप्रधान जनतेच्या प्रश्नासंबंधी आस्था ठेवणारे होते, दुसऱ्या दिवशी दिल्लीतून विमान निघालं नागपूरला आलो, तिथून यवतमाळ आणि वर्धा येथे गेलो. ज्याने आत्महत्या केली त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो आणि विचापूस केली. यानंतर आम्ही दिल्लीला गेलो आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील एकूण ७२ हजार कोटींचं कर्ज माफ करून टाकलं.'' अशी आठवण शरद पवारांनी सांगितलं.

तर ''जेव्हा शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही, तेव्हा तो जीव द्यायला तयार होतो. ते चित्र आज पुण्यात दिसत आहे. आज कांदा उत्पादक संकटात आहेत. हरभरा, सोयाबीन उत्पादक संकटात आहेत. दूध खर्च वाढला आहे. जगावं कसं हा प्रश्न आहे. 64 मागण्या सरकारकडे केल्या तर आजचं सरकार त्याकडे ढुंकण बघायला तयार नाही. एवढा मोठा कृषी प्रधान देश आणि आम्हाला कृषिमंत्री नाही कसा देश चालणार?'' अशा प्रश्नही यावेळी पवारांनी उपस्थित केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT