Pune News : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्जमाफीची बहुप्रतिक्षीत तिसरी यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात तब्बल ४ ते ५ लाख पात्र शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने यादी जाहीर करण्यास विलंब झाला आहे. या त्रुटी एका आठवड्यात दूर करण्याच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात आल्या आहेत.
सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी याबाबत माहिती दिली. कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीमध्ये राष्ट्रीयीकृत तसेच खासगी व्यापारी बँकांच्या कर्जदारांची संख्या मोठी असणार आहे. बँकांकडून आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीची छाननी करताना व्याज, दंडव्याज आणि अतिरिक्त व्याजाचा मुद्दा अडथळा ठरला आहे.
काही बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर दंडव्याज तसेच वाढीव व्याज आकारले होते. सरकारच्या धोरणानुसार दंडव्याज आणि वाढीव व्याज माफ करण्याबाबत बँकांसोबत बैठका घेऊन स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित खात्यांची माहिती दुरुस्त करून पुन्हा सादर करण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय संयुक्त कर्जखाती, नावांच्या इंग्रजी स्पेलिंगमधील चुका आणि जुन्या आधारकार्डमुळे आधार संलग्नतेतील अडचणी यामुळेही काही शेतकऱ्यांची प्रकरणे रखडली आहेत. या तांत्रिक त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांचा समावेश तिसऱ्या यादीत केला जाणार आहे.
तिसऱ्या यादीत सुमारे ४ ते ५ लाख पात्र शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमधील कर्जदारांची संख्या सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिल्लक राहिलेली सुमारे ४० ते ५० हजार कर्जखातीही या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. ही तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर नियमित कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची संख्या २६ लाखांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफीच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेलाही वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत १६ लाख १ हजार १८९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप सुमारे ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.
प्रलंबित आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आधारमधील माहितीतील त्रुटी, नावातील फरक किंवा जुना आधार क्रमांक यामुळे लाभार्थ्यांना अडचणी येत असल्याने संबंधितांनी आवश्यक दुरुस्ती करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्जमाफीसोबतच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर लाभाची प्रक्रियाही सुरू आहे. सुमारे २४ लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा इन्सेंटिव्ह लाभ स्वतंत्रपणे वितरित केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.