Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : ट्रेलर दाखवलाय! खासदार निवडून द्या, पिक्चर दाखवतो; अजितदादांचे मुळशीकरांना आवाहन

Baramati Loksabha Election : दिलेल्या उमेदवाराचे बटन दाबा, गेल्या कित्येक वर्षात न झालेली कामे करून देतो, असे दिले आश्वासन.

Uttam Kute

Pimpri News : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभेची जागा महायुतीत अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाला मिळणार आणि तेथील उमेदवार सुनेत्रा पवार याच असणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मतदारसंघात कामाला लागले असून त्यांनी पक्षाचे मेळावे तथा जाहीर सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यांनी शनिवारी (ता. 24) सायंकाळी मुळशी तालुक्याच्या घेतलेल्या मेळाव्यात लोकसभा निवडणूक ही पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल,असा अंदाज व्यक्त केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर - वेल्हा - मुळशीचा हा मेळावा घोटावडे फाटा येथे झाला. माजी नगरसेवक मयूर कलाटे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, पिंपरी - चिंचवडचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मेळाव्याला खासकरुन उपस्थित होते. पुढील सभेसाठी जायचे असल्याने अजित पवार यांनी अगोदर भाषण केले. यावेळी त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे बटन दाबा. गेल्या कित्येक वर्षात न झालेली कामे पाच वर्षात करून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री या नात्याने मुळशी तालुक्याला काही कोटींचा निधी देऊन मी फक्त ट्रेलर दाखवलाय, खासदार निवडून द्या, संपूर्ण पिक्चरच दाखवतो, असे ते म्हणाले.

शरद पवारांप्रमाणे त्यांनी मुळशीतील जुने कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांची नावे यावेळी अजितदादांनीही घडाघडा वाचून दाखवली. प्रत्येक निवडणुकीत स्टेजवर पहिल्या रांगेत बसणाऱ्या पांडुरंग राऊत यांचा त्यांनी खास उल्लेख केला. माझ्यावर कोणी टीका केली तरी चालेल पण ती मला कुणावर करायची नाही या त्यांच्या शब्दांतून काहीसा नरमाईचा निवडणुकीतील सूर यावेळी दिसला. केंद्रातील सत्तेसाठी गरज असलेला खासदार तुम्ही निवडून दिला पाहिजे. त्यासाठी आशीर्वाद घ्यायला आलो आहे, अशी साद त्यांनी घातली. तो निवडून आला तर तुमची कामे मोदी - शहांकडून करून आणतो हा माझा शब्द आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशातील 65 टक्के जनतेला मोदी हे पंतप्रधान म्हणून हवे असल्याचे सर्व्हेत दिसून आले आहे. तर त्यासाठी विरोधकांकडे पर्यायच नाही, असा टोला अजितदादांनी यावेळी लगावला. देशात पुन्हा 'एनडीए'चं सरकार येणार असून मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. म्हणून त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकासाची कामे होतील,असे ते म्हणाले. बेरजेचे राजकारण करा वजाबाकी करू नका, असा सल्ला त्यांनी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT