Tukaram Mundhe: रिअॅक्टिन प्लस (Reactin Plus) गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, नोंदी ठेवणे आणि त्या बाजारातून परत मागवणे याबाबत गंभीर अनियमितता आढळल्यामुळं, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यातील 'सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेड'च्या 'कॅरीइंग अँड फॉरवर्डिंग' (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द केला आहे.
एफडीएच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील वडकी येथील कंपनीच्या मुख्य गोदामाची तपासणी केल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी हा परवाना रद्द करण्याचा निर्णय अंमलात आला. कंपनीच्या औषध साठवणूक आणि वितरण प्रणालीमध्ये अनेक नियामक त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएला औषधे थेट जमिनीवर ठेवलेली आढळली तसंच पॅलेट्स आणि रॅकची अपुरी व्यवस्था, प्रत्यक्ष साठा आणि संगणकीकृत नोंदींमधील तफावत आणि मुदत संपलेल्या औषधांच्या हाताळणीबाबतच्या प्रक्रियेतील व नोंदींमधील त्रुटी यांसारख्या गोष्टी एफडीएनं टाकलेल्या धाडीत निदर्शनास आल्या.
पीटीआयच्या माहितीनुसार, या वर्षी जूनच्या सुमारास केलेल्या तपासणीदरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांना 'रिअॅक्टिन प्लस' गोळ्यांच्या पॅकेजिंगवर एक अनधिकृत दावा आढळला होता. 'शेड्युल एच' (Schedule H) अंतर्गत येणाऱ्या या औषधाचे वर्णन 'वेदनानाशक आणि ताप कमी करणारे' (analgesic and antipyretic) असं करण्यात आलं होतं. एफडीएचा यातील या गोष्टीवर आक्षेप होता की, पॅकेजिंगवरील हा दावा आवश्यक परवानगीशिवाय करण्यात आला होता आणि तो 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४०' व 'ड्रग्ज रूल्स, १९४५' मधील तरतुदींच्या विरोधात होता. त्यानंतर, या नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी एफडीएनं सुमारे ११.९१ लाख रुपये किंमतीचा 'रिअॅक्टिन प्लस'चा साठा जप्त केला.
एफडीएने कंपनीला बाजारातून सदोष लेबलिंग असलेल्या (misbranded) 'रिअॅक्टिन प्लस' गोळ्या परत मागवण्याचे निर्देश दिले होते. पण कंपनीनं औषधं परत मागवण्याच्या सूचनांचे आणि या प्रकरणातील इतर आवश्यक उपाययोजनांचं पूर्णपणे पालन केलेलं नाही, असं एफडीएनं सांगितलं आहे. त्यानंतर C&F युनिटच्या औषध विक्री आणि वितरण प्रणालीची तपासणी केली असता आणखी त्यातही त्रुटी आढळल्या. यामध्ये खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष संगणकीकृत साठा यांमधील तफावत, तसंच प्रभावित औषधं परत मागवण्याबाबत दिलेल्या सूचनांचं पालन न करणं या गोष्टींचा समावेश होता.
एफडीएनं सिप्ला कंपनीच्या औषधांच्या साठा व्यवस्थापनातील त्रुटींकडंही लक्ष वेधलं आहे. यामध्ये प्रत्यक्ष साठा (physical inventory) आणि संगणकीकृत नोंदींमधील तफावत यांचा समावेश होता. कारण औषधं थेट जमिनीवर ठेवलेली आढळली, तसंच योग्य साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या पॅलेट्स आणि रॅकची व्यवस्था त्या ठिकाणी अपुरी होती. तपासणीदरम्यान मुदत संपलेल्या औषधांशी संबंधित नोंदी ठेवणे आणि प्रक्रियांचे पालन करणे यांबाबतही त्रुटी आढळून आल्या होत्या. या तपासणीनंतर, एफडीएनं कंपनीच्या युनिटाला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि कंपनीचं त्यावर स्पष्टीकरणही तपासलं.
या तपासणीत एफडीएचा असा निष्कर्ष होता की, तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी, तसंच रिॲक्टिन प्लस टॅब्लेट्स परत मागवण्यासंबंधीच्या निर्देशांचे पुरेसं पालन झालेलं नाही. त्यानंतर एफडीएनं सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वाडकी येथील सी अँड एफ युनिटचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्टपासून रद्द केला. यावर स्पष्टीकरण देताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले की, औषध सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर, विशेषतः 'शेड्यूल एच' प्रिस्क्रिप्शन औषधांच्या जाहिरात, विक्री, साठवणूक आणि वितरणाच्या बाबतीत कोणालाही सूट दिली जाणार नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, मुंडे म्हणाले, "औषधांच्या उत्पादन आणि वितरणात सहभागी असलेल्या कोणत्याही संस्थेकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.