

Beed News : बीड नगरपालिकेतील सावळा गोंधळ काही केल्या थांबताना दिसत नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील कुरघोडीच्या राजकारणाने आधीच बीडकरांचे प्रश्न अडगळीत पडले आहेत. त्यात आता सभापतींनी सर्वसाधारण सभेतील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा मुद्दा उपस्थित करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय १९ नगरसेवकांनी निजाम यांचा राजीनामा घेण्यासाठी विशेष सभा बोलवा, अशी मागणी नगरराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नगरसेवकांचाही समावेश आहे. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचाही समावेश आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचे प्रकरण सभापती शेख निजाम यांच्या आता अंगलट येण्याची शक्यता आहे. निषेध, मोर्चे आणि आंदोलनानंतर आता बीड नगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरपालिकेतील स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवून त्यावर चर्चेसाठी त्वरित विशेष सभा बोलवा, अशी मागणी करणारे लेखी निवेदन नगराध्यक्षांकडे देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद उद्गार काढल्याने शहरात संतापाची लाट पसरली होती.
याप्रकरणी तीव्र आंदोलने, पुतळा दहन होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नगरसेवकांमध्ये रोष आहे. नगरपालिकेच्या महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १,९६५ मधील कलम ८२ (२) नुसार आवश्यक संख्येने नगरसेवकांनी ही मागणी केली आहे. या विशेष सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सभापती निजाम यांच्या राजीनाम्यावर सविस्तर चर्चा करून पालिकेची भूमिका ठरवावी, अशी मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.