Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
पुणे

अजितदादांचे दोन उमेदवारांनी ऐकले नाही... दोघांवरही पैसा खर्च करण्याची वेळ

गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेच्या प्रकाश म्हस्के (हवेली) आणि आत्माराम कलाटे (मुळशी) या दोन माजी अध्यक्षांना आता विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे दोघेही जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक आहेत.

यापैकी म्हस्के हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आली आहे. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच विकास दांगट यांच्यासोबत म्हस्के यांची मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे. दांगट हे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नेते आहेत. येथून ते दोनदा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होेते. तसेच 2009 मध्ये मनसेचे रमेश वांजळे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते अपयशी झाले. नंतर 2017 त्या महापालिका निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता जिल्हा बॅंकेसाठी त्यांनी कंबर कसली आहे.

म्हस्के यांना या निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. हवेलीतील निवडणूक मोठी चुरशीची असते. विकास सोसायटीचे प्रतिनिधी या `अ` मतदारसंघात मतदार असतात. त्यांना सांभाळण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. अजितदादांनी या दोघांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. त्यामुळे पक्षाने येथे अधिकृत उमेदवार दिला नाही. परिणामी दोघांनीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी खिसा मोकळा सोडावा लागत आहे.

मुळशी तालुक्यातील आत्माराम कलाटे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे परंतु मध्यंतरी त्यांनी पक्ष सोडल्याने यंदा त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील चांदेरे यांच्या माध्यमातून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

म्हस्के आणि कलाटे हे दोघेही अनुक्रमे हवेली आणि मुळशी तालुका अ वर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हवेली तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन्ही तुल्यबळांनी उमेदवारी मागितली होती. त्यामुळे या दोघांपैकी कोणालाही पक्षाची अधिकृत उमेदवारी न देता, मैत्रीपूर्ण लढतीसाठी हा मतदारसंघ सोडल्याचे या पक्षाच्यावतीने याआधीच जाहीर करण्यात आले आहे.

आत्माराम कलाटे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार केला होता. याच लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक रिंगणात होते. यात पवार यांचा पराभव झाला. मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि कलाटे यांना धडा शिकविण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादी कॉंगेसने येथून नवीन व तरुण चेहऱ्याला संधी दिल्याची चर्चा जिल्हा बॅंकेत रंगली आहे. सध्या कलाटे कोणत्याच पक्षात नसून, ते अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT