पिंपरी : यावर्षी १६ फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या खूनाचा कट काल उघड झाला. तर, परवा मावळात किशोऱ आवारेंच्या खुनाच्या बदल्याचे कटकारस्थान समोर आले.
त्यासाठी पाच पिस्तूले आणि १६ जिवंत काडतूसे असा मोठा शस्त्रसाठा परराज्यातून आणण्यात आला होता. दुसरीकडे जानेवारी ते मे या पाच महिन्यात पिंपरी-चिंचवड आयुक्तालय परिक्षेत्रातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह मावळातीलही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीला काही महिने अवकाश असताना या क्षेत्रात राजकीय खून पडू लागले आहेत. मावळात ते दोन झाले. त्यातील हाय पोफाईल किशोर आवारे खुनातील मुख्य सूत्रधार असलेला माजी नगरसेविकेचा पती दीड महिन्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.
तर, पिंपरी-चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाच्या खुनाचा कट कालच उघडकीस आला. त्यातून या निवडणुका येईपर्यंत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. कारण गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी शहरातील गंभीर गुन्ह्यांसह एकूण गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी पाच महिन्यांतच मावळातील दोन राजकीय खुनांसह २३ खून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात झाले आहेत. त्यातून पोलिसांचा दरारा राहिला आहे की नाही, अशी विचारणा आता होत आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील व त्यातही मावळातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. १४ डिसेंबर २०२२ ला ते पिंपरीत रुजू झाले. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मे २०१३ या पाच महिन्यात शहरात एकूण दोन हजार ४७१ गुन्हे दाखल झाले. म्हणजे दररोज सरासरी सोळा गुन्हे नोंद होत आहेत.
गेल्यावर्षी याच कालावधीत तुलनेने कमी म्हणजे एक हजार ८७४ गुन्हे दाखल झालेले होते. म्हणजे गेल्यावर्षी दररोज सरासरी बारा गुन्हे नोंद होत होते. त्यात चारने वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात २३ खून झाले असून त्यातील दोन अद्याप उघडकीस आलेले नाहीत.
या कालावधीत २४४ अपहरणे झाली असून १८९ चाच तपास लागलेला आहे. महिलांविषय़क गंभीर गुन्ह्यांत यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात वाढ झाली असून बलात्काराचे १२१, तर विनयभंगाचे १९३ गुन्हे नोंद झालेले आहेत. तर लुटमारीच्या घटनाही वाढलेल्या आहेत.
खून, खुनाचा कट आणि इतर गुन्ह्यांतही भाजप कनेक्शन
यावर्षी १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील भाजपबरोबरचे माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा नगरपरिषदेच्या आवारातच १२ मे रोजी निर्घूण खून करण्यात आला होता. त्यामुळे मावळ तालुका हादरून गेला. काल ज्यांच्या खुनाचा कट उघड झाला ते ओव्हाळ हे भाजपचेच आहेत.
तर,पश्चिम बंगालवरून नोकरीसाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा गुन्हा याच महिन्यात ११ तारखेला नोंद झालेले पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जून ठाकरे हे ही भाजपचेच आहेत. त्यांना सदर गुन्ह्यात अद्याप अटक झालेली नाही. ते भाजपशी सबंधित असल्याने अटक झाली नसल्याचा आरोप या गुन्ह्यातील फिर्यादी तरुणीनेच केलेला आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.