पुणे जिल्हातील खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित करत एकहाती सत्ता मिळवली आहे. न सभा, न प्रचार सभा तरीही ठाकरेंना खेडमध्ये मोठा विजय मिळवता आला आहे. 16 जागांपैकी तब्बल 12 जागांवर विजय मिळवत उबाठा शिवसेनेने खेड तालुक्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे.
या निवडणुकीचा निकाल पाहता, खेड तालुक्यातील मतदारांनी संघटनात्मक ताकद, स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे आणि पक्षाची विचारधारा यावर विश्वास दाखवला असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत उद्धव ठाकरे किंवा पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याची एकही जाहीर सभा झाली नाही.
राज्यातील इतर पक्षांचे प्रमुख नेते प्रचारासाठी मैदानात उतरले असताना, उबाठा शिवसेनेने मोठ्या सभा टाळून स्थानिक पातळीवरील संपर्क, कार्यकर्त्यांची मेहनत आणि शांत प्रचारावर भर दिला. तरीही खेडमध्ये मशाल पेटली आणि त्याचा थेट फायदा पक्षाला मिळाला.
खेड पंचायत समितीबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीतही उबाठा शिवसेनेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेत पक्षाने 5 जागांवर विजय मिळवला असून, त्यामुळे तालुक्यासोबतच जिल्हास्तरावरही पक्षाची ताकद वाढली आहे. पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा उबाठा शिवसेना हा महत्त्वाचा राजकीय घटक म्हणून पुढे येताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र या विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळे यांना संमिश्र यशाचा सामना करावा लागला आहे. पक्षाने पंचायत समितीवर सत्ता मिळवली असली, तरी त्यांच्या बहिणीला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे खेडच्या राजकारणात सध्या “गड आला, पण सिंह गेला” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. सत्ता जरी हातात आली असली, तरी वैयक्तिक पातळीवर बसलेला धक्का दुर्लक्षित करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.