

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असले तरी निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात करिश्मा चालेलच असे नाही, हे शिरूर तालुक्यातील कारेगाव गटाच्या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओंमुळे चर्चेत असलेल्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा तब्बल 2700 मतांनी पराभव करत विजय मिळवला.
निर्मला नवले या केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहेत. इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर त्यांचे एकूण 5 लाख 74 हजार 377 फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अनेक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली विकासकामे आणि आयटी इंजिनिअर असलेली उच्चशिक्षित प्रतिमा यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.
कारेगाव गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निर्मला नवले यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपने मनीषा पाचंगे यांना मैदानात उतरवले. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर निर्मला नवले यांची हवा दिसत होती. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती, तर व्हिडिओ क्लिप्स, लाईव्ह आणि पोस्ट्समुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या. त्यामुळे डिजिटल लोकप्रियतेचा थेट फायदा निवडणुकीत होईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता.
मात्र, निकालाने सर्व अंदाज फेल ठरवले. प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी मनीषा पाचंगे यांच्या बाजूने कौल दिला. ग्राऊंड लेव्हलवर घराघरांत पोहोचलेला प्रचार, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि संघटनात्मक ताकद याचा फायदा मनीषा पाचंगे यांना झाला. याउलट, सोशल मीडियावरील प्रभाव प्रत्यक्ष मतपेटीत रूपांतरित करण्यात निर्मला नवले कमी पडल्याचे चित्र दिसले.
निर्मला नवले या याआधी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्या काळात उच्चशिक्षित सरपंच म्हणून त्यांचे विशेष कौतुक झाले होते. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या सर्व गोष्टींमुळे त्यांची प्रतिमा एक प्रभावशाली आणि शिक्षित आणि विकसनशील नेत्या म्हणून तयार झाली होती. मात्र, सोशल मिडियासारख्या आभासी जगात कितीही फोलोवर्स असले तरी जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या निवडणुकीत स्थानिक समीकरणे, कार्यकर्त्यांची ताकद आणि प्रत्यक्ष संपर्क अधिक महत्त्वाचा ठरतो, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.