Pune News: मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले. पण दुसरीकडं पुण्यात एक वेगळीच चर्चा पाहायला मिळाली. या चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते आधी मनसेत आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले वसंत मोरे हे होते. वसंत मोरे नुसतेच चर्चेतच नव्हे तर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. वसंत मोरेंचा एक एडिटेड फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये वसंत मोरे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतरच्या त्यांच्या फोटोसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. तसंच 'खेळ कुणाला दैवाचा कळला' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. तसंच दुसरीकडं दुसऱ्या एका राज ठाकरेंसोबत वसंत मोरेंच्या फोटोला 'सर्वात दुःखी माणूस' असं देखील कॅप्शन देण्यात आलं आहे. तसंच कमेंटमध्ये 'सासूसाठी वेगळं राहिलो आणि सासूच वाट्याला आली', 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती', 'दुनिया गोल आहे याचे जिवंत उदाहरण', 'आगीतून उठून फुफाट्यात' अशा आशयाच्या अनेक कमेंट वसंत मोरेंच्या फोटोंवर करत युजर्सनं त्यांना ट्रोल केलं. तर दुसरीकडं मोरेंच्या समर्थकांनी देखील या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.
वसंत मोरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही शिवसेनेसोबत झाली. 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापन केली, त्यावेळी वसंत मोरे हे मनसेमध्ये दाखल झाले. त्यानंतर सन 2012 आणि सन 2017 मध्ये मनसेकडून त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. पण सन 2005 ते सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वसंत मोरे हे मनसे मध्येच राहिले.
सन 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्याला डावललं जात असल्याच्या कारणानं जाहीर नाराजी व्यक्त करत मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पुण्यातील उमेदवार म्हणून लोकसभेचं तिकीट दिलं. निवडणुकीदरम्यान मोरेंनी आपण आता शेवटपर्यंत वंचितसोबतच राहणार असल्याचं सांगितलं. पण लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला देखील सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले.
दरम्यान, वसंत मोरे यांनी प्रदीर्घ काळानंतर जेव्हा मनसे सोडली त्यावेळी पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांच्या राजकारणामुळं आपण मनसेला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं. तसंच आपली राज ठाकरेंवर नाराजी नसल्याचं सांगताना राज ठाकरेंच्या मोठ्या फोटोसमोर लोटांगण घातलं त्यांना अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला अर्थातच ते मनसेतून बाहेर पडले. आता त्यांचा हाच लोटांगण घातलेला फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फक्त एकमेव राज ठाकरेंच्या फोटो ऐवजी त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांचा एकत्र आलेला फोटो त्या ठिकाणी एटिड करुन युजर्सनं लावला आणि त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं.
म्हणजेच वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली असली तरी आता पुन्हा त्यांना राज ठाकरेंसोबतच काम करावं लागणार असल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांचा फोटो एडिट करुन तो व्हायरल करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.