Rupali Chakankar  sarkarnama
पुणे

Rupali Chakankar : आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था रडारवर,कारवाई करण्याचे रुपाली चाकणकरांचे आदेश

Unauthorized Warkari Education Institutes Rupali Chakankar :निर्णयानुसार खाजगी वसतीगृहांसाठी नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी दिले.

Roshan More

Rupali Chakankar News : आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले. आळंदी परिसरातील वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी करत आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासाचा आढावा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी (ता.3) घेतला.

पोलिस तपासाचा आढावा घेतल्यानंतर चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या व मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करावा. तसेच पोलिसांनी पुढाकार घेत, मुलांना विश्वासात घेऊन अजून असे प्रकार झाले असतील तर त्या दृष्टीने ही कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.

बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार खाजगी वसतीगृहांसाठी नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांचा अहवाल सात दिवसात सादर करावा. संस्था सुरू करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग यांची परवानगी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या संस्थांवर दोन दिवसात कारवाई करा असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, परवानगी असलेल्या परंतु नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात यावी. नियमावलीनुसार मुला- मुलींची निवास व्यवस्था स्वतंत्र करण्यात यावी. वसतीगृहांमध्ये आवश्यक कर्मचारी वर्ग असावा, पुरेशी निवास व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, बालकांच्या संख्येनुसार स्नानगृहे, स्वच्छतागृहे असावीत. पालकांच्या विनंती अर्जानुसार बालकांना संस्थेमध्ये प्रवेश द्यावा, पुरेसे स्वच्छ व निर्जंतुक पिण्याचे पाणी इत्यादी नियमांचे तंतोतंत पालन संस्थांनी करावे असेही त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर पोलीस विभाग, महिला व बाल विकास, महसूल, नगरपालिका, शिक्षण व स्थानिक ग्रामस्थ यांची समिती करण्यात येईल. या समितीकडून संस्थांची वारंवार तपासणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागात सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी आळंदीतील ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेविषयी तक्रारी जाणून घेतल्या. स्थलांतरित संस्था तसेच वारकरी शिक्षण संस्थांना भेटी देऊन विद्यार्थी संख्या, त्यांची राहण्याची व्यवस्था, संस्थेतील विद्यार्थी नोंदणी रजिस्टर आदींची पाहणी केली.

रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या आढाव्याच्या वेळी लीस उपअधीक्षक शिवाजी पवार, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा बिरारीस, प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस.नरके, मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT