Nitin Gadkari News Sarkarnama
पुणे

Nitin Gadkari News: सध्याच्या राजकारणात विचारभिन्नता नाही तर विचारशून्यता; नितीन गडकरींचा घरचा आहेर

Pimpri Chinchwad: प्रा.रामकृष्ण मोरे यांच्यावरील `परामर्शःएका शिल्पकाराचा`या ग्रंथाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महाराष्ट्राचे दिवंगत शिक्षणमंत्री काँग्रेसचे प्रा.रामकृष्ण मोरे यांच्यावरील `परामर्शःएका शिल्पकाराचा`या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२९) सायंकाळी पिंपरी चिंचवडमध्ये पार पडले.

यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणात विचारभिन्नता नाही, तर विचारशून्यता असल्याचा घरचा आहेर सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर दिला. तीच आजची आपली खरी समस्या असल्याचे ते म्हणाले.

प्रा.मोरे शिक्षणमंत्री होते, तेव्हा मी आमदार होतो, असे सांगत त्यावेळच्या राजकारणात कटूता नव्हती. विचारात मतभिन्नता होती, पण मनभेद नव्हते. वैचारिक मतभेद असले तरी विधीमंडळाबाहेर आमचे चांगले सबंध होते, असे परखड भाष्य त्यांनी सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर केले.

त्याचा एक किस्साही त्यांनी कथन केला. शरद पवारांसह सर्व पक्षांनी मिळून त्यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशींचा सत्कार केला होता. त्यावर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनीही हे कसं शक्य आहे, अशी विचारणा केली होती, असे गडकरींनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांचा वंशज असलेले प्रा.रामकृष्ण मोरे हा काहीतरी वेगळाच माणूस होता, असे प्रशंसोद्गार गडकरींनी यावेळी काढले. एवढे फीट असूनही त्यांचा अकाली मृत्यू कसा झाला हे समजले नाही, असे ते म्हणाले. पीसीसीओई या इंजिनिअरींग कॉलेजच्या सभागृहात हा सोहळा होता. तो धागा पकडून त्यावर गडकरींनी मिश्कील टिपण्णी केली.

विज्ञानात ५२ टक्के मार्क मिळाल्याने इंजिनिअर व्हायची इच्छा असूनही मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर आता इंजिनिअरींग कॉलेजात भाषणे करताना संकोचायला होते, असे ते म्हणताच उपस्थितांनी त्याला दाद दिली. आतापर्यंत सहा डिलीट पदव्या मिळाल्याचे त्यांनी सांगताच पुन्हा हशा झाला.

संत वाङ्‌मय डिजीटल आणि पालखी मार्गात हिरवळ करणार

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहूणे, तर संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार उल्हास पवार तसेच गजानन एकबोटे आदी यावेळी व्यासपीठावर होते.

दिग्विजयसिंह आषाढी वारीला पायी जातात. आपल्यापेक्षा वयस्कर असूनही ते पायी वारी करतात हे पाहून गडकरींनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले. आपल्याला हे धाडस होणार नाही, हे ही प्रांजळपणे कबूल केले. मात्र, पंढरीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून १२ हजार कोटी रुपयांच्या पालखी मार्गामध्ये हिरवळ तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

संत वाडमय डिजीटल करण्याचे कामही हाती घेतले असून गजानन महाराजांच्या पोथीचे ते झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा आणि संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता डिजीटल करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT