Satish Kolpe Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी शिक्षकाला बनविले उपसभापती!

शिरूर बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रा. सतीश कोळपे यांची बिनविरोध निवड

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (shirur) तालुक्यातील एका छोट्याशा गावातील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाला आज (ता. १० फेब्रुवारी) चक्क शिरूर बाजार समितीच्या उपसभापतीपदाची संधी मिळाली. बाजार समितीचा कार्यकाळ संपण्यास कमी कालावधी असताना उपसभापतीपदासाठी अनेकजण इच्छूक होते. परंतू, शेतकरी कुटूंबातील प्रा. सतिश भागूजी कोळपे या साध्या शिक्षकाला पक्षनिष्ठेच्या व प्रामाणिकपणाच्या बळावर थेट उपसभापतीपदाची लॉटरी लागली आहे. (Unopposed election of Satish Kolpe as Deputy Chairman of Shirur Bazar Samiti)

शिरूर बाजार समितीच्या उपसभापतीपदी इतर संचालकांनाही संधी मिळावी, या उद्देशाने प्रवीण चोरडिया यांनी राजीनामा दिल्याने रक्त झालेल्या पदासाठी आज (ता. १० फेब्रुवारी) निवड प्रक्रिया पार पडली. तरूण संचालक प्रा. सतिश कोळपे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, अंतर्गत बरेच राजकारण घडले. बाजार समितीचा कार्यकाळ एक वर्षांचा राहिला असून, या कालावधीत उपसभापतीपदी वर्णी लावण्यासाठी अनेक संचालकांनी कंबर कसली होती.

अनेक जुने-नवे संचालक उपसभापतीपद मिळविण्यासाठी तीव्र इच्छूक होते. प्रा. कोळपे यांच्यासह छाया बेनके, ॲड. सुदीप गुंदेचा, वीजेंद्र गद्रे व बंडू जाधव यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. बराच खल झाल्यानंतरही, प्रा. कोळपे यांच्यासोबतच छाया बेनके यांचे नाव अंतिम क्षणीही आघाडीवर होते. छायाताईंचे पती आलेगाव पागा (ता. शिरूर) गावचे सरपंच अप्पासाहेब बेनके हे गतवर्षी भाजपचा त्याग करून पत्नी छायाताईंसह राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील झाल्यानंतर त्यांनीही उपसभापतीपद मिळविण्यासाठी 'फिल्डींग' लावली होती. सर्व इच्छूकांच्या मुलाखती घेतल्यानंतर अखेर पक्षश्रेष्ठींनी पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणाच्या बाजूने कौल देत प्रा. कोळपे यांना संधी देण्याचे जाहीर केल्यानंतर इतरांनी तलवारी म्यान केल्या व प्रा. कोळपे यांची बिनविरोध निवड झाली.

शिरूर बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत प्रा. कोळपे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापती बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक शंकर कुंभार यांनी जाहीर केले. या निवडीनंतर प्रा. कोळपे यांचा आमदार ॲड. अशोक पवार व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव-शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील; तसेच प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे व शंकर जांभळकर हे बाजार समितीचे माजी सभापती यावेळी उपस्थित होते. या निवडीनंतर प्रा. कोळपे यांच्या समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

उपसभापतीपदी निवड झालेले प्रा. कोळपे हे बाजार समितीच्या सोसायटी मतदार संघातून निवडून आलेले असून, या निवडीपूर्वी त्यांनी गुनाट (ता. शिरूर) या आपल्या गावातील सहकारी सोसायटीचे चेअरमनपद भूषविले आहे. गुनाट गावातील संस्कार युवा मंचचे प्रमुख असलेले प्रा. कोळपे हे पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे यांचे धाकटे बंधू आहेत. बाजीराव कोळपे यांना १९९७ ला पंचायत समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा प्रा. कोळपे यांच्या रूपाने गुनाट या छोट्याशा गावाला तालुकापातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. प्रा. कोळपे यांची उपसभापती निवड झाल्याचे जाहीर होताच त्यांच्या गुनाट गावातही जल्लोष साजरा करण्यात आला.

बाजार समितीच्या मालकीच्या तालुक्यातील वडगाव रासाई, तळेगाव ढमढेरे, जांबुत, पाबळ आदी ठिकाणच्या जागा डेव्हलप करतानाच शेतमालाला अधिकाधिक भाव कसा मिळेल, बाजार समितीत येणा-या कृषी मालाची खरेदी - विक्री प्रक्रीया आणखी सुलभ कशी होईल, याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे प्रा. कोळपे यांनी या निवडीनंतर 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT