Smita Chavan-sunil shelke-Rasika Kalokhe Sarkarnama
पुणे

सासूबाईंनी भूषविले सरपंचपद, तर सूनबाई बनल्या पहिल्या नगराध्यक्षा!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : श्री क्षेत्र देहू (ता. हवेली, जि. पुणे) नगरपंचायतीचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (ncp) स्मिता शैलेश चव्हाण यांना मिळाला. त्यांची शुक्रवारी (ता.११ फेब्रुवारी) बिनविरोध निवड झाली. त्यांचे पारडे जड असल्याचे वृत्त ‘सासू देहूच्या सरपंच झाल्यानंतर आता सून नगराध्यक्षा होण्याची शक्यता’ ‘सरकारनामा’ने २७ जानेवारी रोजी दिले होते. ते खरे ठरले. नात्यागोत्याचे राजकारण आणि स्थानिक हा फॅक्टर देहूतही उजवा ठरला. (Unopposed election of Smita Chavan of NCP as council chairman of Dehu)

स्मिता यांच्या सासूबाई सुमन चव्हाण या नगरपंचायत होण्यापूर्वी देहू ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. त्यामुळे सासूनंतर आता सूनबाई देहूच्या नगराध्यक्षा झाल्या आहेत. त्या स्थानिक असल्याने पंचक्रोशीत त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे जड होते. उपनगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीच्याच रसिका काळोखे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

देहू नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी ११ ठिकाणी महिला निवडून आल्या आहेत. त्यातच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षही महिला झाल्याने देहूनगरीत पहिल्याच टर्ममध्ये महिलाराज अवतरले आहे. निवडीनंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात देहूत हा विजय साकारण्यात सिंहाचा वाटा असलेले मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके सहभागी झाले होते. देहूत १७ पैकी १४ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत, तर फक्त एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले आहेत. दोन अपक्ष निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला मिळाले आहेत.

राज्यभरातील नगरपंचायतींच्या काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत देहूचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील (एससी) महिलेसाठी राखीव निघाले. त्या प्रवर्गात देहूमध्ये बहूमत मिळालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्मिता चव्हाण आणि पूजा दिवटे या दोघीच निवडून आल्या आहेत, त्यामुळे या दोघींनीच अर्ज दाखल केले होते. मात्र, दिवटे यांनी शुक्रवारीच माघार घेतल्याने चव्हाणांचा बिनविरोधचा मार्ग आज मोकळा झाला.

उपनगराध्यक्ष पदासाठी फक्त काळोखे यांचा एकमेव अर्ज आल्याने या पदासाठीही निवडणूक घ्यावी लागली नाही. अडीच वर्षांच्या पहिल्या कालावधीसाठी देहूचे नगराध्यक्षपद हे एससी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातील दिवटे यांनाही राष्ट्रवादी दीड वर्षानंतर वर्षभरासाठी संधी देण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT